लॅब असिस्टंट, पोलिसाला कोरोनाची बाधा; वडकबाळ, उळे येथे कोरोनाचा शिरकाव
सोलापूर – आज दिवसभरातील धक्कादायक बाब म्हणजे एका महिलेचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. उत्तर सदर बाजार येथे राहणाऱ्या या ६३ वर्षीय महिलेला तीन एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आज दिवसभरात एकूण दहा लोक पॉझिटिव्ह आढळून आले. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा १४५ वर पोहोचला आहे.
दोन दिवसांपूर्वी ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाला कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले होते. या दोन्ही पोलिसांच्या संपर्कात आलेल्या ३९ लोकांची तपासणी केली असता त्यात एका पंचावन्न वर्षीय पोलिसाला बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. बाधित झालेला पोलीस हा वडकबाळ येथे कार्यरत होता. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे
तर दुसरीकडे उळे येथील एका लॅब असिस्टंटला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या युवकाचा परिवार मोठा असून त्याच्या कुटुंबातील आणि संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी आज मंगळवारी दुपारी ताब्यात घेण्यात अाले.

तेलंगी पाच्छापेठ,राहुल गांधी झोपडपट्टी, उळेगाव, नीलमनगर एमआयडीसी, बुरुरू टाकळी एकतानगर वॉलचंद कॉलेजजवळ हुडको कॉलनी विजापूर रोड, कामाठीपुरा सोलापूर, पोलिस मुख्यालय ग्रामीण सोलापूर या परिसरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात सहा पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.
आज केगाव येथून इन्स्टॉलेशन क्वारंटाइन मधून ४४ लोकांना सोडून देण्यात आले. तर कोरोना मुक्त झालेले एकूण रुग्ण २४ आहेत. आज दिवसभरात १६९रुग्णांची चाचणी करण्यात आली त्यापैकी १५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह अाले तर १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
सध्या आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या २४०७ असून त्यापैकी २१७२ जणांचा अहवाल प्राप्त झाला तर २०२७ जणांचा अहवाल निगेटिव्ह अाला. अजून २३५ जणांचा अहवाल प्रलंबित असून आतापर्यंत १४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यात ९ मृतांचा समावेश आहे. मृतांपैकी ४ पुरुष अाणि ५ महिला आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या ११२ आहे
असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.