सोलापूरात कोरोनाचा पहिला बळी, मृत्यू व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह ;मृत्यूनंतर अहवाल आल्याने धोका वाढला
सोलापूर : कोरोना मुक्त असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये आज कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापुरातील सोलापुरातील न्यु पाच्छा पेठ परिसरातील किराणा दुकान चालकाची कोरोनाचाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही चाचणी करण्यात आली होती.
10 एप्रिल रोजी पहाटे त्याला उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 11 एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. पाच-सहा पेठ परिसरातील एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला असून याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी व पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर हा अहवाल यंत्रणेच्या हाती पडल्यामुळे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
रविवारी दुपारपासून जोडबसवण्णा चौकातील प्रार्थनास्थळ परिसरात अकस्मातपणे पोलिसांच्या अन् महसूल अधिकाºयांच्या गाड्यांचा ताफा आला, तशी या ठिकाणी लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. डॉक्टरांची टीमही घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, या प्रार्थनास्थळाजवळील एका किराणा दुकानदाराचा नुकताच मृत्यू झाला असून, त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली.
सदर किराणा दुकानदार गेल्या काही दिवसांपासून कुणाकुणाच्या संपर्कात आला होता, याची चौकशी पोलीस खाते कसोशीने करीत आहे. तर संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला डॉक्टरांच्या ताब्यात दिले जात आहे. पुढील १४ दिवसांसाठी या किराणा दुकानदाराशी संबंधित परिसर सील करण्यात आला असून, त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास सर्वांनाच क्वारंटाईनमध्ये दाखल केले जाईल.