पुणे : राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे जवळपास चोवीस तास याच कामात व्यस्त आहेत. या व्यस्ततेतून काही क्षणाची वेळ काढून ते मुंबईतील रूग्णालयात जातात.
त्याला कारण ही तसेच आहे.रूग्णालयात ऍडमिट असलेल्या जीवन मृत्यूशी झुंज देत असलेल्या आपल्या आईला ते भेटतात. अवघ्या काही मिनिटांचीच ती भेट असते. गेल्या काही दिवसांपासून हाच टोपे यांचा दिनक्रम बनला आहे.एकंदरीत काय तर एकीकडे आपली आई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे तर दुसरीकडे ते दुःख बाजूला ठेवून ते राज्यावर आलेल्या संकटाशी दोन हात करत आहेत.

टोपे काल पुण्यात होते. पुण्यातील कोरोनाची स्थिती व वाढणारा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. बैठका, आढावा, आवश्यक उपाययोजना, माध्यमांना योग्य माहिती देण्याची जबाबदारी हा ताण रोजचा आहे. या साऱ्या चर्चेच्या ओघात त्यांनी आईच्या आजारपणाविषयी माहिती पुण्यातला आपल्या मित्राला सांगितली. रूग्णालयात असलेल्या आईला भेटायलाही रोज पुरेसा वेळ मिळत नसल्याची खंत त्यांनी आपल्या या मित्राजवळ बोलून दाखवली. अर्थात हे सांगताना त्यांचे डोळे भरून आले होते.


महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. साहजिकच यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये घबराट आहे. याच पार्श्वभूमीवर दररोज पत्रकार परिषद घेऊन सद्यपरिस्थिती नेमकी काय आहे? काय उपाययोजना केल्या जात आहेत?नागरिकांनी काय खबरदारी घ्यायची आवश्यकता आहे? याची माहिती दोन्ही नेते सातत्याने देत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या तसंच आरोग्य आणि पोलिसांच्या सातत्याने बैठका पार पडत आहेत. यामध्ये शासन महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. तसंच या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली त्याची माहिती माध्यमांना समोर जाऊन मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री देत आहेत.

जेव्हापासून महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला आहे तेव्हापासून शासन आणि प्रशासन अतिशय गंभीर होऊन काम करत आहे. मग त्यामध्ये हॉस्पिटलमधली परिस्थिती, डॉक्टरांना सूचना, रूग्णालयात काय हवं नको, रूग्णांच्या अडचणी याकडे जातीने लक्ष देण्याचं काम मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री करत आहेत.