सामनाची सुरुवात ही बाळासाहेब ठाकरे यांनी नव्हे तर ‘या’ पत्रकाराने केली होती..

0
262

वर्तमानपत्र.. मग ते प्रादेशिक असो की राष्ट्रीय भाषेतलं ते सामान्यत: लोकांपर्यंत देशभरातील घडामोडी पोहोचवण्याचं अर्थात बातम्या देण्याचं काम करतं. पण शिवसेनेचं मुखपत्र असलेलं ‘सामना’ हे देशातलं एकमेव असं दैनिक आहे जे कायम बातम्यांमध्येही असतं. म्हणजे देशभरातील माध्यमंसुद्धा सामना काय छापतं यावर लक्ष ठेवून असतात. सामनात छापलेली बातमी किंवा अग्रलेख इतरांसाठी ‘बातमी’चा विषय असतो.

शिवसेना सत्तेत असो वा बाहेर, या पक्षाची भूमिका नक्की काय आहे हे पाहण्यासाठी सामनाचा विचार आजही जरूर केला जातो.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

‘सामना’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मुलाखती, किंवा त्यातील बातम्यांची शीर्षके यामुळे प्रादेशिक किंवा राष्ट्रीय माध्यमे सामनाच्या भूमिकेवर लक्ष ठेवून असतात.

शिवसेना म्हणजे सामना आणि सामना म्हणजे शिवसेना असं समीकरण झालं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीची पूर्ण छाप सामनावर होती. पण सामनाची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केलीच नाही, असं आज सांगितलं तर लोकांचा पटकन विश्वासही बसणार नाही.

1966मध्ये शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकातून शिवसेनेची भूमिका मांडली जायची.

1988 साली शिवसेनेचे दैनिकही असावे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली आणि त्याबाबत विचार होऊ लागला.
सामना हे नाव कोणाला सुचलं?

नवं दैनिक काढायचं म्हटल्यावर शिवसेनेत झालेल्या घडामोडींबद्दल शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या आठवणी योगेंद्र ठाकूर यांच्या ‘शिवसेना समज-गैरसमज’ या पुस्तकासाठी सांगितल्या आहेत. त्या आठवणींमध्ये दैनिकाचं नाव सुचण्यावरून झालेल्या चर्चांचाही उल्लेख आहे.

देसाई सांगतात, “दररोज बाळासाहेबांबरोबर आमची बैठक व्हायची. दैनिकाचे नाव काय असावे यावर अनेकांनी अनेक नावे सुचविली, परंतु ती नावे काही समर्पक वाटत नव्हती. एके दिवशी मा. बाळासाहेबांनी दैनिकाचे नाव सुचविले. ‘सामना’.”

नावनोंदणी आणि बार्शी कनेक्शन

आपल्या आठवणींमध्ये सुभाष देसाई सांगतात, “सामना नावाची नोंदणी करण्यासाठी मी दिल्लीला गेलो. वृत्तपत्र नावनोंदणी कार्यालयात कळले की सामना हे नाव बार्शी-सोलापूर येथे राहाणाऱ्या वसंत कानडे यांच्या नावावर आहे. त्यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक होते.
“सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यास सांगितले. त्याच दरम्यान मी तुळजापूर येथे कामासाठी गेलो असताना तुळजापूर विश्रामगृहात बार्शीचे शिवसैनिक श्री. वसंत कानडे यांना घेऊन आले. बाळासाहेबांनी सामना हे दैनिकाचे नाव सुचविले आहे. परंतु या नावाची नोंदणी तुमच्या नावावर आहे. तर वाक्य संपायच्या आत ‘नाव दिले’ असे वसंत कानडे यांनी उद्गार काढले.”

‘सामना’ नावाला परवानगी दिल्यानंतर वसंत कानडे यांनी मातोश्री निवासस्थानी येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्याचे सुभाष देसाई यांनी आठवणींमध्ये नमूद केले आहे.

तसेच हे नाव देताना ‘सामना’मध्ये माझ्या बातम्या व लेख यावेत अशी ‘प्रेमळ अट’ही घातल्याचे देसाई सांगतात.

वसंत कानडे कोण होते?

वसंत कानडे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे. माढा आणि बार्शी तालुक्यातून त्यांनी पत्रकारिता केली.

कानडे यांच्या पत्रकारिटतेबद्दल अधिक माहिती देताना1त्यांचे नातू अमोल म्हणतात वसंत कानडे यांचे कुर्डुवाडीतील शिवसेनेचे नेते प्रकाश गोरे यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांच्यामुळेच शिवसेनाप्रमुखांची भेट आणि सामनाच्या नावाचे हस्तांतर झाले. शिवसेनेचा सामना दैनिक स्वरूपात असलं तरी कानडे यांचा सामना साप्ताहिक स्वरूपात प्रसिद्ध होत होता. 2002 साली कानडे यांचं निधन झालं.”

कानडे यांच्या पत्रकारितेबद्दल ‘बार्शी जनता टाइम्स’चे संपादक संतोष सूर्यवंशी सांगतात, “वसंत कानडे यांचं लेखन अत्यंत सडेतोड असायचं. त्यांची राजकीय वार्तापत्रं विशेष गाजायची. सोलापूर जिल्ह्यात ते सतत फिरत असायचे. सामना, केसरी, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध व्हायचे. राजकीय नेत्यांमध्ये त्यांची ऊठबस असायची. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता.”

सुशीलकुमार शिंदेंनी केलं उद्घाटन

वसंत कानडे यांनी 10 ऑक्टोबर 1975 रोजी साप्ताहिक सामनाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.

या अंकाचं उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन युवक कल्याण राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

पहिल्याच अंकामध्ये संपादक कानडे यांनी सुशीलकुमार शिंदे, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव जगताप, माजी आमदार बाबूराव पाटील यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

आजचा सामना

23 जानेवारी 1989 रोजी रात्री सामनाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. पहिल्या दिवसाची प्रिंट ऑर्डर 1,50,000 इतकी होती.

पहिल्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख सामना कार्यालयात दोन-तीन तास येऊन बसायचे, बैठका घ्यायचे, सूचना द्यायचे.

सुरुवातीला जवळ-जवळ दीड वर्ष सामनाचे प्रिंटिंग जयंत साळगावकरांच्या ‘कालनिर्णय’मध्ये होत असायचं, असं योगेंद्र ठाकूर यांनी शिवसेना समज-गैरसमज पुस्तकात नमूद केलं आहे.

मार्मिक साप्ताहिक आणि सामनातील भाषा याबद्दल गेली अनेक वर्षे चर्चा होत आहे.

आपल्याविरोधात लिहिणाऱ्या लेखांना खास सामना स्टाईल दिलेलं प्रत्युत्तर तसेच पत्रकारांवर, वर्तमानपत्रांच्या कार्यालयांवर झालेले हल्ले यामुळे शिवसेनेवर टीका होत राहिली. काहींना सामनातली भाषा आक्रमक म्हणून आवडते, तर काहींना ती शिवराळ भाषा असभ्य वाटते.

यासर्व परिस्थितीवर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ या पुस्तकातील ‘… तो अखबार निकालो’ या प्रकरणात भाष्य केले आहे.

सामनाबद्दलच्या या प्रकरणाचा शेवट करताना ते निरीक्षण नोंदवतात: ‘हाताशी स्वतःचं हक्काचं मुखपत्र आल्यावर शिवसेना, शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिक यांच्या वर्तनात इतका कमालीचा फरक पडला, की आपल्या विरोधात चार शब्द लिहिणारं अन्य कोणतंही ‘अखबार’ हे नष्टच व्हावं, असं त्यांना वाटू लागलं. पत्रकारितेच्या माध्यमातून ठाकरे यांनी राजकारण सुरू केलं होतं… आणि राजकारणाच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्राची सत्ताही संपादन करता आली होती; पण या साऱ्या प्रवासात त्यांच्या पत्रकारितेची मात्र शोकांतिका होऊन गेली होती.’

संपादक हे लाभाचं पद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्याच्या प्रमुखपदी असताना संपादकपद नावावर असल्याने अडचण निर्माण झाली असती. त्यामुळे सामनाचं संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. क्रेडिट लाईनमध्ये रश्मी ठाकरे यांचं नाव प्रसिद्ध करण्यात आलं आहे.सध्या कार्यकारी संपादक संजय राऊत हे सामनाची सर्व धुरा पेलत आहेत. त्यांच्या लिखाणाची शैली ती रोखठोक आहे.
संदर्भ-

अकोलकर प्रकाश, जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे, मनोविकास प्रकाशन

ठाकूर योगेंद्र, शिवसेना समज गैरसमज, आमोद प्रकाशन

साभार BBC News मराठी

Best IT Comany In Maharashtra , Solapur