समजवायच …… कुणी कुणाला ..?
१ फ़ेब्रुवारी … सकाळी ९ ची वेळ . अचानक वैरागमधे बातमी येऊन धडकली . वैरागचे फलफले कुटूंबीयाचा जेजुरी ला देवदर्शनाला जाताना वेळापुर जवळ अपघात झाला . जागेवर ५ ठार झाले . मन, डोके , सुन्न झाल . दोन वर्षा पुर्वी शिलवंत कुटुंबीयाच्या लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात होऊन त्यात घरटी १-२ व्यक्ती मृत्युमुखी पङल्या होत्या . त्या वेळे पासुन ती गल्ली कायम सुतक पडल्यासारखी वाटत होती .सकाळी ११ च्या पुढ भीषण शांतता …..
हळुहळु ते विसरत चालल होत तर ….. तेथुन पुढच २०० फुटावर फलफलें च्या वाडयावर काळाची नजर गेली .
कांही वर्षापुर्वीच श्री. नागेश फलफले यांच निधन झाल .२ मुल , २मुली , आई , पत्नी , मुलांसारखे जावई असा सुखाचा संसार चालु असताना . मधेच ते जग सोडुन गेले .
त्यांच्या दोन्ही मुलांनी घर सावरलं , पुन्हा किराणा दुकान , दुध व्यवसाय , शेती . कष्टाळु पोर होती दोघही . मा. श्री. ओमप्रकाश शेटे साहेबां सारखे भावजी थोरल्या भावासारखे पाठीशी होते . सुख समाधानात चाललं होत सगळ. शेटे साहेब मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे प्रमुख असल्याने फलफलेंच्या वाडयावर रोज रुग्णांची मदतीसाठी ये -जा असायची .
दोघे भाऊ मनापासुन सर्वांना मदत करायचे .आलेल्या प्रत्येकाचे हसुन स्वागत आणि काम मार्गी लावणे हे अंगवळणी पडलेल काम . सगळ छान चालल होत .
वैरागला ही छान वाटायच . शेटे साहेबांसारखा ‘ देवदुत ‘ जावई मिळाला म्हणून . लाखो रुपयांचा निधी साहेबांनी सासरवाडीच्या विकासाला दिला .
मॉडेल गाव करायच म्हणुन साहेबांच सासरवाडीवर विशेष प्रेम. मध्यंतरी काम चांगली झाली नाहीत म्हणुन त्यानी संबंधीतांची कानउघाडणी ही केली होती .

साहेब तुम्ही ” देवदुत ” असतानाही ” यमदूताची ” तुमच्या सासरवाडीकडे नजर गेलीच कशी ?महाराष्ट्रातील लाखो रुग्णाचा आशीर्वाद फलफलें कुटूंबाला या अपघातातुन वाचवु का शकला नाही ?
देव आहे की नाही असा प्रश्न पडतो . असा प्रसंग वैऱ्यावरही येऊ नये .
सायंकाळच्या ६-४५ च्या दरम्यान ३ अॅम्बुलन्स ६ जणांची कलेवर घेऊन वैरागमधे प्रवेश करती झाली आणि तासभर वाट पहात असणाऱ्या आया -बायांचा बांध फुटला . पुरुष मंडळी डोळयाच्या कडा पुसु लागली . मित्र मंडळी टाहो फोडुन दुःखाला वाट करून देऊ लागले .
एकाच ट्रॅक्टर वर एकाच घरातील सहा जणांचे मृतदेह ….. काळजाचा ठोका चुकवणारे ते क्षण . शोकाकुल वैरागकर आवंढा गिळत शेवटच्या निरोपासाठी महादेव माळाकडे चालु लागले .
काळाचं भेसूर रुप पहिल्यांदा अनुभवलं. एका आईन सोन्यासारखी दोन मुल गमावली . संपुर्ण एक कुटूंब काळाचा घास बनल होत . घरावर लक्ष ठेवणाऱ्या आजीबाई . त्यांची दोन नातवंडे , दोन पतवंडे , एक नातसुन .
आणि दोघी बहिणींना आता राखी बांधायला हात कुठुन आणायचे . माहेर .दुधावरची साय . पण संपुर्ण दुध च ओतु गेल . रखरखत्या कोळशावर त्या दुधाची राख झाली . बहिणींच माहेर डोळयासमोर नाहीस झाल . कुणाच्या अध्यात मध्यात नसणारे फलफले का काळाच्या पडद्याआड गेले .न उलगडणारं कोड . आयुष्यावर चा विश्वास उडवणारा प्रसंग .
श्री. संतनाथ महाराज त्या माऊलीला या सर्वातुन सावरण्याच सामर्थ्य देवोत हीच प्रार्थना .
सर्वांना भावपुर्ण श्रद्धांजली
किशोर आनंदराव देशमुख
मी वैरागकर अभियान व देशमुख कुटूंबीय, वैराग