वैरागमध्ये २ तर बार्शी शहरात १ पॉझिटिव्ह रुग्णाची भर
कोविड १९ बाधितांची एकूण संख्या २९ वर
बार्शी बार्शी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत शनिवारी आणखी तीन जणांची भर पडली. वैराग येथे दोन तर बार्शी शहरात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. बार्शी शहरात आजपर्यंत एकूण ८ जण बाधित आढळून आले आहेत. तर तालुक्यातील आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या २९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत १८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत तर १० जणांवर उपचार सुरू आहेत.

वैराग येथील पौळ गल्लीतील एकजण व बार्शी शहरातील उपळाई रोड भागातील वायकुळे प्लॉट येथील डॉक्टर कोरोना बाधीत आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचे अहवाल शनिवारी तालुका आरोग्य प्रशासनास प्राप्त झाले. त्यात तिघेजण पॉझिटिव्ह आढळून आले.

अधिक माहिती देताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष जोगदंड म्हणाले, शनिवारी दि २० रोजी बार्शी तालुक्यातील एकुण १८ स्वॅब अहवाल प्राप्त असुन अदयाप ३६ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आज प्राप्त झालेल्या १८ स्वॅब अहवालापैंकी बार्शी शहर येथील प्राप्त ०८ स्वॅब अहवालांपैकी ०७ अहवाल निगेटिव्ह आलेले असुन गुंड प्लॉट, परांडा रोड बार्शी येथील ०१ अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

वैराग येथील प्राप्त ०९ स्वॅब अहवालांपैकी ०७ अहवाल निगेटिव्ह आलेले असुन वैराग पौळ गल्ली ०१, शारदा देवी नगर ०१ असे एकुण ०२ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. कुसळंब येथील प्राप्त ०१ स्वॅब अहवालांपैकी ०१ अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
मुळची सोलापूर येथे रहिवासी असलेली एक महिला सोलापूर येथे खाजगी हॉस्पिटलला उपचार घेताना कोविड बाधित आढळुन आलेली आहे. सदर महिला ही बार्शी येथील आरएसएम हाईटस येथे काही काळासाठी वास्तव्यास होती. त्यामुळे अधिकची खबरदारी म्हणुन आरएसएम हाईटस परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. दरम्यान, वैराग व बार्शी शहरात बाधित रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू झाली.
