विदेशातून आलेल्या बार्शीकरांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, अक्कलकोटेंची हात जोडून विनंती
बार्शी – तालुक्यातील अनेक नागरिक म्हणजेच मूळचे बार्शीकर हे नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त आणि इतर कारणास्तव विदेशात आहेत. ते अनिवासी बार्शीकर सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बार्शीत, आपल्या गावाकडे आले आहेत. या नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधून आपली तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच, सरकार दरबारी आपण कुठल्या देशातून आलो, कधी आलो याबाबतचा तपशील देण्याचं गरजेचं आहे. मात्र, या नागरिकांकडून, त्यांच्या कुटुबियांकडून याबाबतची माहिती लपविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबियांनी विदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन करण्यात आलं आहे. मात्र, या लॉक डाऊनपूर्वीच विदेशातील बार्शीकरांचे मायभूमीत, भगवंत नगरीत आगमन झाल्याची माहिती आहे. मात्र, या नागरिकांकडून ही माहिती लपविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या नागरिकांनी क्वारंटाईन करुन राहणे आवश्यक आहे. तर, यांच्या कुटुंबीयांनीही यासंदर्भात प्रशासन आणि आरोग्य विभागाला माहिती देणं गरजेचं आहे. मात्र, हे लपविण्यात येत असल्याचं अक्कलकोटे यांनी म्हटलंय. त्यामुळे, शेजारधर्म म्हणून नागरिकांनी यांसदर्भात प्रशासनाला माहिती द्यावी, अशी हात जोडून विनंती अक्कलकोटे यांनी केली आहे. विशेष म्हणजे कालच नागराध्यक्षांनीही नागरिकांपुढे हात जोडले होते.
प्रशासनाकडून लवकरच त्यासाठी संपर्क क्रमांक आणि संबंधित विभागाची नावे जाहीर करण्यात येतील, असेही अक्कलकोटे यांनी म्हटले.