राज्यातील विधान परिषदेच्या ९ रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर करावी, अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. २४ एप्रिलला राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संकटामुळे या जागेसाठी होणाऱ्या निवडणूका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही निवडणूक पुढे ढकलल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.


केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे विषेश मार्गदर्शनाखाली या निवडणूका घेता येतील, असा उल्लेख राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये केलाय. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करावी, याची शिफारस महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधींनी राज्यपालांकडे केली होती. यासंदर्भात निर्णय घेण्यापेक्षा राज्यपालांनी उद्धव ठाकरेंसमोरील पेच सोडवण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवल्याचे पाहायला मिळते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक न लढवता २८ नोव्हेंबर २०१९ रोजी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांना सहामहिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून यावे लागणार आहे. राज्यपालांनी शिफारस मंजूर केली असती तर त्यांचा मार्ग सुकर झाला असता पण आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यावर राज्यातील राजकारणाची पुढील गणिते अवलंबून असतील. मुख्यमंत्रीपदासाठी निर्माण झालेल्या तांत्रिक बाबींना हातळण्याचे अनेक मार्ग आमच्याकडे उपलब्ध आहेत, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय.