मुंबई: महाविकास आघाडीचा विधान परीषद निवडणुकीतील तीढा सोडवण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात प्रमुख नेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीतून अखेर मार्ग निघाला आहे.
विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने २ उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीतील पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. अखेर काँग्रेसने १ जागा लढवण्यास तयारी दाखवल्याने आता महाविकास आघाडी ५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे.

काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीत दूसरा उमेदवार उभा करू नये. जेणे करून निवडणुक बिनविरोध व्हावी या दृष्टीने महत्वाची चर्चा या बैठकीत झाली. पण सगळ्यांच्या सहमतीने काँग्रेस रिंगणात एकच उमेदवार उभा करणार आहे. येत्या २१ तारखेला विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रत्येक पक्षानं संख्याबळानुसार उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी उभे राहत असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आग्रही होती. पण काँग्रेस मात्र २ जागांवर ठाम होती. काँग्रेस जर दुसरा उमेदवार देत नसेल, तर आपणच निवडणुकीला उभे राहत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. शिवसेनेकडून ही बातमी लिक झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचे सूर उमटले होते.
काँग्रेस पक्षाकडून २ उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता काँग्रेसचा कोणता उमेदवार माघार घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेसने बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश राठोड यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी घोषित केली, तर शिवसेनेनं उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावे निश्चित केली आहेत.