भगवंताची नगरी ‘बार्शी’
लेखिका : डॉ. रजनी जोशी, बार्शी
‘भगवंताची नगरी’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात बार्शी शहराची ओळख आहे. बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिध्द आहे आणि हेच बार्शीचे ग्रामदैवत आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीने बांधण्यात आले आहे. महाराष्ट्रात हेमाड ह्या पाषाणामधील कोरलेले एकमेव मंदिर आहे. मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे. गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीर्ष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणूक शहरातूनकाढली जाते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका भगवंत भक्ताची समाधी आहे.
दक्षिणे यस्य सद्भक्त:, ‘अंबरीष:’ कृतांजलि:।
पृष्ठे लक्ष्मी: स्थिता वन्दे, भगवंतं पुन: पुन: ॥

महाराष्ट्राच्या पारमार्थिक क्षेत्रात विख्यात असलेले सोलापूर जिल्ह्यातील ‘बार्शी’ हे तालुक्याचे गाव. ‘भगवंत’ या नावाने प्रसिध्द असलेले श्रीविष्णूचे पुराणप्रसिध्द देवालय अखिल भारतात केवळ बार्शी येथेच आहे. याचे मूळ नांव ‘द्वादशीक्षेत्र’ असे आहे. द्वादशीला प्राकृत भाषेत ‘बारस’ असा प्रतिशब्द आहे. भक्तश्रेष्ठ राजा अंबरीषाच्या ‘साधनद्वादशीच्या’ व्रतावरून द्वादशी म्हणजे बारसपूर-बारशी-बार्शी असे नाव प्रचलित झाले असावे. राजा अंबरीषाच्या रक्षणासाठी साक्षात श्रीविष्णू लक्ष्मीसह ‘भगवंत’ या नावाने येथे अवतार धारण करते झाले. त्यांचे येथे विशाल मंदिर उभारण्यात आले. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकादशी करून श्रीपांडुरंगाचे दर्शन घेऊन बार्शीस द्वादशीच्या दिवशी श्रीभगवंत दर्शन-पूजनानंतर उपवास सोडावयाचा, असा भक्तजन वारकरी यांचा वर्षानुवर्षांचा प्रघात पडलेला आहे. भगवंताच्या पाठीशी श्रीलक्ष्मीची मूर्ती (मुखवटा) कोरलेली आहे.
बारशी (बार्शी) हे नाव प्रचलित होण्याबाबत आणखीही एक उपपत्ती सांगितली जाते. या नगरीत बारा पवित्र तीर्थे आहेत. ‘श्री अंबरीष विजय’ या प्राकृत ओवीबध्द ग्रंथात त्यांचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे येथे १२ शिवमंदिरेही आहेत. तेव्हा यावरून ‘बाराशिव’ (बारा पवित्र तीर्थांचे गाव अथवा बारा शिवमंदिराचे गाव) असे या गावास नाव मिळाले असावे. अशा रितीने ज्याप्रमाणे भक्त पुंडलिकाच्या भेटीस परब्रह्म पांडुरंग पंढरपुरास आले, त्याचप्रमाणे या नगरीत भक्त अंबरीषाच्या रक्षणार्थ श्रीविष्णू ‘भगवंत’ या नावाने अवतीर्ण झाले, असा या भगवंत नगरीचा अपार महिमा आहे. पंढरपुरास श्रीविठ्ठल दर्शन घेताना वारकरी मंडळी ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ असा उद्घोष करतात, तर या नगरीत भक्तजन ‘अंबरीष वरदा श्री भगवान’ या शब्दात देवाची आळवणी करताना दिसतात.
पौराणिक संदर्भ व राजा अंबरीषाची कथा
श्रीमद्भागवत ग्रंथराजाच्या नवव्या स्कंधातील चौथ्या अध्यायात, श्रीगुरुचरित्राच्या तिसऱ्या अध्यायात, तसेच लिंगपुराण, पद्मपुराण, स्कंद पुराण या ग्रंथांतून व ‘अंबरीषविजय’ या ओवीबध्द प्राकृत ग्रंथात भक्तराज अंबरीष याची विस्ताराने कथा आलेली आहे.
सूर्यकुलोत्पन्न ईक्ष्वाकू राजाच्या कुळात जन्मलेल्या ‘राजा सगर’ याचा पणतू, साक्षात गंगेला पृथ्वीवर आणणारा ‘राजा भगीरथ’ याचा हा वंशज. त्याच्या वडिलांचे नाव ‘नभग’ असे होते, म्हणून अंबरीषाला ‘नाभाग’ असेही नाव होते, याचा उल्लेख ‘कामंदकीय नीतिसार’ तसेच गुमानी पंडित रचित ‘शतोपदेश प्रबंध’ या संस्कृत ग्रंथांतही आढळतो. हा अंबरीष (नाभाग) बालपणापासून भगवद्भक्त होता. त्याला संपत्ती, ऐहिक सुखाबाबतही आसक्ती नव्हती. तो यमुना (कालिंदी) नदीच्या तीरी वास्तव्य करून होता. त्याच्या थोरल्या भावांनी वडिलांचे राज्य, संपत्ती वाटून घेतली. सर्वात लहान भाऊ अंबरीषास काहीच वाटा दिला नाही. अंगीरस ऋषींनी केलेल्या यज्ञात तो सहभागी झाला. त्याच्या विद्वत्तेमुळे त्याला खूप सन्मान मिळाला. यज्ञात मोठी संपत्तीही मिळाली. परंतु विरक्त वृत्ती असल्याने त्याने कालांतराने सर्व वैभवाचा त्याग करून भगवंतप्राप्तीसाठी वनात एकांतात राहून तपश्चर्या आरंभिली. बारा वर्षे निष्ठेने घोर तपश्चर्या केल्यानंतर त्याला भगवंताचे दर्शन व दिव्य ज्ञान प्राप्त झाले. नारदमुनींच्या सल्ल्यानुसार तो तीर्थक्षेत्रे हिंडत अखेरीस दंडकारण्यातील (सध्याचा महाराष्ट्र प्रांत) पंकावती (पंकपूर) या नगरीत (म्हणजे सध्याचे बार्शी शहर) पुष्पावती नदीच्या काठी वास्तव्यास आला. नारदमुनींच्या सांगण्यावरून त्याने साधनद्वादशीचे व्रत स्वीकारले. दशमी दिवशी एकभुक्त (एकवेळ जेवण) राहून एकादशीला पूर्ण निर्जल उपवास करून द्वादशीला सकाळीच भगवंताचे दर्शन, पूजन करून उपवास सोडणे असे या त्रिदिवसीय व्रताचे स्वरूप होते. व्रतसमाप्तीनंतर फार मोठया प्रमाणात दानधर्म केला जाई. अंबरीष राजाने व्रतानंतर साठ लक्ष गायी दान केल्या होत्या, असा उल्लेख आहे. त्याच्या या तपश्चर्येमुळे, साधनद्वादशी व्रताचरणामुळे इंद्राचे सिंहासनही डळमळले. इंद्रपद जाण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा भ्यालेल्या इंद्राने शीघ्रकोपी दुर्वास ऋषींना अंबरीषाचे सत्त्वहरण करण्यासाठी पृथ्वीवर, दंडकरण्यातील पंकपुरास (बार्शी नगरीस) पाठविले. मोठा शिष्य परिवार घेऊन दुर्वास राजाकडे आले. त्या दिवशी एकादशी होती, वेळ सायंकाळची होती. राजाने स्वागत केल्यावर ते म्हणाले की उद्या पहाटे पुष्पावती नदीवर स्नान उरकून सूर्योदयाच्या वेळी तुझ्याकडे येतो. परंतु येण्यास त्यांनी मुद्दामच विलंब लावला. राजानेही व्रतभंग होऊ नये म्हणून शास्त्राधार पाहून, तेथे असलेल्या कौशिक मुनींच्या सल्ल्याने केवळ तीर्थ घेऊन द्वादशीच्या पर्वकाळी उपवासाचे पारणे केले. नदीवरून परतलेल्या दुर्वास ऋषींनी राजाने अतिथी सत्कारापूर्वी पारणे केले हे लक्षात घेऊन त्याला अनेक योनीत जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला व रागारागाने जटा भूमीवर आपटल्या. त्यातून एक कृत्या (राक्षसी) निर्माण झाली. त्या मायावी राक्षसीचे राजापुढे काहीच चालले नाही. भगवंतांनी राजाच्या रक्षणार्थ पाठविलेल्या सुदर्शन चक्राकडून तिचा नाश झाला. ते चक्र दुर्वासांच्याच मागे लागले. त्यांना पळता भुई थोडी झाली. ते भगवान शंकराकडे, ब्रह्मदेवाकडे व विष्णूकडेही रक्षणार्थ गेले. परंतु चक्राचा पाठलाग चालूच राहिला. भगवंतांनी दुर्वासास राजाची क्षमा मागण्यास सांगितले, तेव्हा नाइलाजाने अंबरीषाकडे परत येऊन त्यांनी त्यांची विनवणी केली. राजाच्या सांगण्यावरुन सुदर्शन चक्राची गती शांत झाली. ते चक्र या नगरीतील उत्तरेश्वर शिवमंदिरापुढील सरोवरात (सध्या विहिरीच्या रूपातील चक्रतीर्थ) विसावले. दुर्वासांची सुटका झाली. त्यांच्या शापामुळे घ्यावे लागणारे अनेक जन्म दशवतारांच्या रूपाने भगवंतांनी धारण केले. भक्तीचा महिमा अगाध आहे.
मंदिरासाठी नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७६० मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने १८२३ मध्ये व ब्रिटिश सरकारने १८७४ मध्ये सनदा दिलेल्या आढळतात. अंतिम सनदेनुसारच सध्याचा कारभार पाहिला जात आहे. प्रतिवर्षी चैत्री, आषाढी, कार्तिकी व माघी एकादशीला असंख्य भक्तजन वारकऱ्यांची श्री भगवंत दर्शनासाठी झुंबड उडते. आषाढी, कार्तिकी एकादशीला गरुडावर आरूढ श्री भगवंताची मिरवणूक निघून नगर प्रदक्षिणा होते. पौर्णिमेला छबिना निघतो. रथातून ही उत्सवमूर्तीची मिरवणूक निघते, पालखी निघते. मंदिरात नित्य काकडा आरती, नित्य पूजा – महापूजा, सायंकाळी धूपारती व रात्री शेजारती इत्यादी कार्यक्रम होतात. वैशाख शुध्द षष्ठी ते वैशाख शुध्द द्वादशी – म्हणजे श्री भगवंत प्रकटदिनापर्यंत, श्री भगवंत प्रकटदिन सप्ताह, भागवत सप्ताह, तुकाराम बीज, गोकुळ अष्टमी, दासनवमी व वर्षभर प्रवचन-कीर्तनाचा कार्यक्रम व अन्य उत्सवही होतात. भक्तजनांचा उत्साह अवर्णनीय असतो. देवस्थान ट्रस्टचा कारभार भक्तांच्या देणगीवरच चालतो. परगावाहून येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय आहे. पुण्याचे एन्.सी.एल.चे माजी प्रमुख डॉ. आर.एन. शुक्ला यांनी श्री भगवंत मंदिरास २०१२ साली भेट दिली. ते इतिहास, पुरातत्त्व व अध्यात्माचे गाढे अभ्यासक आहेत. तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की श्री तिरुपती बालाजीमध्ये जी ऊर्जा आहे, तेवढीच ऊर्जा श्री भगवंताच्या मूर्तीमध्ये आहे. असा आपल्या सामान्य माणसाचा पांडुरंग व तिरुपती बालाजी आहे, ज्याचे सहज, सुलभ केव्हाही दर्शन घेता येते.
असा आहे या द्वादशीक्षेत्राचा महिमा!
ॐ नमो भगवते वासुदेवाय।