वंचित बहुजन आघाडीकडून 24 जानेवारीला बार्शी बंदचे आवाहन
बार्शी – वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटन विवेक गजशिव यांनी 24 जानेवारी रोजी बार्शी बंदचं आवाहन केलं आहे. एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाशान्वये बंदचे आवाहन करण्यात येत असल्याचे गजशिव यांनी म्हटले आहे. कायदा व सुव्यवस्था राखून बार्शी बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही गजशिव यांनी केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. सीएए आणि एनआरसी विरोधात 24 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यासंदर्भातच भेट होती. त्यांनी आम्हाला विनंती केली की, जसं मागच्या वेळी दादर टीटीचं आंदोलन शांततेत घडलं. त्याच शांततेत हे आंदोलन झालं पाहिजे, आम्हीसुद्धा त्यांना सांगितलं की दादरचं जसं शांततेत आंदोलन झालं, तसंच आंदोलन आताही होणार आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटले होते.
आंबेडकरांच्या या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हा आणि तालुका स्तरावर बंदचे आवाहन करत आहेत. त्यानुसार, बार्शीतही विवेक गजशिव यांच्याकडून बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर ,शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी पाठिंबा दिल्याचे गजशिव यांनी सांगितले.