लोकांना घरात बसवून त्यांच्या मनात उद्धव घर बांधताहेत! उद्धव बोलतात, तेव्हा! वाचावा असा लेख…

0
272

उद्धव बोलतात, तेव्हा! वाचवा असा लेख…

संजय आवटे मुख्य संपादक दिव्य मराठी

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

“आमचं तोंड बंद करण्याची हिंमत कोणाचीच नव्हती, पण या छोट्याशा विषाणूनं माझ्याही तोंडाला पट्टी (मास्क) बांधली!…”

उद्धव_ठाकरे

उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं बोलतात, त्याला वक्तृत्व स्पर्धेचे सराईत परीक्षक कदाचित फार मार्क्स देणार नाहीत. उद्धव यांचे वडील करिश्मा असलेले वक्ते होते. राज हेही क्राउडपूलर आहेत. सध्या नरेंद्र मोदी हे फर्डे वक्ते आहेत, असे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे असते. किंचाळणं सुरू करण्यापूर्वीचे देवेंद्रही प्रभावी वक्ते होते, असं अनेकांना वाटतं.

उद्धव यांच्या वक्तृत्वात तसं काही नाही. आणि, तरीही ते आश्वस्त करतात. लोकांना आपले वाटतात. आपल्यातले वाटतात, पण आपलं रक्षण करतील, अशा क्षमतेचेही वाटतात. आज खुद्द बाळासाहेब अथवा राज या जागी असते, तरी लोकांना ही खात्री वाटली नसती, जी आज वाटते आहे. उद्धव जेव्हा बोलताना ‘माझ्या महाराष्ट्रात तरी लॉकडाऊन कायम असेल’, असा उल्लेख करतात, तेव्हा खरंच त्यांचा हा महाराष्ट्र आहे, आपल्या पाल्याविषयी ते बोलताहेत, असं मनापासून वाटतं.

जरा वेगळ्या अंगानं विचार करतोय.
मी स्वतः वक्ता म्हणून याकडं बघतोय.

उद्धव यांचे कपडे बघा. मोदींसारख्या नेत्यानं स्वतःला ‘कॅरी’ कसं करायचं याची एक शैली विकसित केली आहे. त्यांचे विरोधकही मोदींच्या या परिभाषेला बळी पडत आहेत. अशावेळी पॅंट-शर्ट, तेही इन, अशा साध्या मध्यमवर्गीय पेहरावात धीरोदात्त संयमाने उद्धव लोकांसमोर येतात. शिवसेनेचा वाघ, शिवसेनाप्रमुखांचं लोकांवरचं गारूड असा काही विचार न करता अगदी अनौपचारिक साधेपणानं वावरतात.

सहजपणे, पण मनापासून, आत्मीयतेने, ‘नो नॉनसेन्स’ आणि नेमका संवाद करतात. कधी आल्हाददायक कोट्या करतात, कविता कोट करतात, मध्येच अडखळतात… पण ‘लाइव्ह’ असतात. आणि, हे आता आपत्ती आहे म्हणूनच नाही. एरव्हीही त्यांचा संवाद मुख्यमंत्री झाल्यापासून याच पालकत्वाच्या शैलीत आहे.

सुरुवातीला, ‘मीही मर्द आहे…’ असले उद्योग त्यांनीही करून पाहिले. पण, मिमिक्री सोडून मग ते स्वतःच्या शैलीकडे वळले. आता त्यांना ती नीट सापडली आहे, असे म्हणायला जागा आहे.

ही तुलना नाही. ती होऊ शकत नाही. पण, सहज विचार करत होतो. गांधी वा आंबेडकर अथवा नेहरूदेखील रुढ अर्थानं फर्डे, हुकुमी वक्ते नव्हते. पण, कमालीची पॅशन, कमिटमेंट त्यांच्या शब्दा-शब्दातून प्रत्ययास येत असे. प्रत्येक शब्द लोकांना थेट भिडत असे.

खूप चांगल्या, हुकुमी वक्त्यांचं अनेकदा असं होतं की शैली त्यांच्या कंटेंटवर मात करते. कोणत्याही विषयावर उत्तमच बोलत असल्यानं त्यांच्या शैलीचा एक साचा तयार होतो. ‘परफॉर्मन्स’ म्हणून तो छान असतोही, पण त्याचा प्रामाणिक परिणाम संपतो. सामाजिक जीवनात अथवा राजकारणात उदंड यश मिळवणारे लोक फार चांगले वक्ते नाहीत, असे आपल्या लक्षात येईल.

तर, केवळ वक्तृत्वाच्या जोरावर राजकारणात फार तीर मारता येत नाहीत, असंही अनेकांच्या लक्षात आलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, कॉम्रेड डांगे, प्रमोद महाजन, नरेंद्र मोदी असे काही वक्ते- नेते आपण बघत आहोत, बघितले आहेत. पण, वक्तृत्वापेक्षाही मनापासूनचं बोलणं आणि कृती म्हणून त्या बोलण्याशी इमान राखणं हे लोकांना अधिक भावतं, असा अनुभव आहे.

केवळ फर्ड्या वक्तृत्वावर देश जिंकणारे नेते कालांतराने मात्र ओसरले, असं जगाचा इतिहास सांगतो. अनेकांची भाषण ऐकून असं वाटतंः काय जोरदार आणि अगदी अमोघ असं भाषण ठोकलं यानं… काय रेवडी उडवली विरोधकांची! पण, तो माझ्याशी बोलत होता, असं मात्र नाही वाटत! ते बापुडे शब्द असेच विरून जातात.

बराक ओबामा हे थोर वक्ते. मला स्वतःला सर्वाधिक आवडणारे वक्ते. पण, ओबामांच्या शैलीनं कंटेंटवर कधी मात केली नाही. ‘मला काही सांगायचंय’, ही त्यांची तहान कधी संपली नाही. त्यामुळे ते ओसरले नाहीत.

हुकुमी भाषणं ‘छापणं’ लोकांना कधीच भिडत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशी भाषणं सभा गाजवू शकतात, पण ती लोकांच्या मनात घर नाहीत करू शकत. मी स्वतः वक्ता म्हणून उद्धव यांच्या वक्तृत्वाकड बघत होतो. तेव्हा, हे वाटलंः लोकांना घरात बसवून त्यांच्या मनात उद्धव घर बांधताहेत! अर्णबपेक्षा रवीश लोकांना अधिक का भिडतो, त्याचंही कारण हे आहेच.

ज्याला प्रभावी वक्तृत्व असं म्हणण्याची प्रथा आहे, त्याचाच फेरविचार वक्त्यांनी करायला हवा.
अत्रे यांच्यासारखा दमदार वक्ता महाराष्ट्रावर राज्य करत होता, त्यानंतर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यासारखा संयत, एका अर्थाने एकसुरी वक्ता आला आणि त्याने जग जिंकले. मुद्दा असा की, शैली कोणतीच अजिंक्य नसते आणि कोणतीच शैली प्रभावशून्य नसते. (या दोन्ही शैली मला आता आवडत नाहीत, हा माझा व्यक्तिगत मुद्दा.)

सांगायचे हे की, तुमचा आतला आवाज तुम्हाला ऐकू यायला हवा आणि लोकांच्या आतल्या आवाजाशी त्याचं नातं असायला हवं. तर, खरा संवाद होतो.
नाहीतर, ते वक्तृत्व कसले? साराच गोंगाट! किंवा मनोरंजन आणि फारतर ‘मनी’रंजन!

  • संजय आवटे राज्य संपादक दिव्य मराठी

Best IT Comany In Maharashtra , Solapur