लॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा – मुख्यमंत्री
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: आज ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरु करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते आहे हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले.

याप्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीदेखील सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या देशातील महत्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

महाराष्ट्रातली रुग्ण संख्या मोठी असली तरी रुग्ण झपाट्याने बरेही होत आहेत. फिल्ड हॉस्पिटल, पल्स ऑक्सिमीटरचा वापर, प्लाझ्मा थेरपी, ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे, शंभर टक्के कॅशलेस उपचार, व इतर काही गोष्टी प्रभावी ठरताहेत. महाराष्ट्र यात देशात उदाहरण निर्माण करेल असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही सर्वच जण अतिशय तळमळीने रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात पण माझ्या दृष्टीने आता आकडेवारीपेक्षा तुम्ही रुग्णांना काय सुविधा देत आहात, त्यांना कसे बरे करीत आहात, उपचारांचे कसे नियोजन केले आहे याला महत्त्व आहे.
संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची नियमित तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासावी. रक्तदाबाकडे लक्ष ठेवावे. चाचणी ही लक्ष्य केंद्रित (फोकस्ड) असावी .जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर घराघरांत सर्वेक्षण करून रुग्ण शोधणे खूप महत्त्वाचे आहे. रुग्णाला रुग्णालयातून सोडण्याबाबत कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.