लॉकडाऊन जिओला लाभदायक, रिलायन्स जिओमध्ये फेसबुकची ४३,५७४ कोटींची गुंतवणूक

0
284

मुंबई: रिलायन्स जिओ कंपनीत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक करुन फेसबुक जिओचे ९.९९  टक्के मालकी  हक्क खरेदी करणार आहे. फेसबुकची गुंतवणूक जिओच्या विस्तार योजनेसाठी लाभदायी ठरणार आहे. रिलायन्स इंडस्ट्री, जिओ आणि फेसबुक या ३ कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे फेसबुकच्या गुंतवणुकीसाठी केलेल्या कराराची माहिती दिली.

फेसबुकने जाहीर केलेल्या गुंतवणुकीमुळे रिलायन्स जिओचे बाजार मूल्य (मार्केट व्हॅल्यू) ४.६२ लाख कोटी झाले आहे. तसेच फेसबुक कंपनी जिओची सर्वात मोठी समभाग धारक (शेअर होल्डर) झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

लॉकडाऊन काळात भारतात झालेली ही सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती  होणार आहे. भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी थेट विदेशी गुंतवणूक आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका छोट्या कंपनीत विदेशी कंपनीने केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

भारतीय उद्योग क्षेत्राची विश्वासार्हता वाढल्यामुळे मोठ्या  गुंतवणुकीचा निर्णय घेतल्याचे फेसबुक कंपनीच्यावतीने जाहीर करण्यात आले. रिलायन्स जिओमुळे भारतात इंटरनेटचा वापर वाढला आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. फक्त ४ वर्षात जिओ कंपनीने ३८ कोटी ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. हे बघूनच जिओमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे फेसबुकच्यावतीने सांगण्यात आले.

जिओ कंपनीने २०१६ मध्ये इंटरनेटचे  आकर्षक प्लॅन सादर करुन बाजारात प्रवेश केला आणि ४ वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली. जिओची ही कामगिरी बघूनच फेसबुकने गुंतवणुकीचा निर्णय घेतला.

लॉकडाऊन ठरला लाभदायी

कोरोनाचा प्रार्दुभाव थोपवण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोट्यवधी नागरिक घरात बसून आहेत. अनेक उद्योग ठप्प असल्यामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. पण लॉकडाऊनचा  हा काळ जिओला लाभदायी ठरला आहे. वेळ घालवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने इंटरनेटचा वापर करत आहेत. वर्क फ्रॉम होम करणारे तसेच टाईमपास करणारे असे कोट्यवधी नागरिक इंटरनेटच्या वापरासाठी जिओवर अवलंबून आहेत. जिओने दररोज १ जीबी किंवा त्यापेक्षा जास्तीचा डेटा प्लॅन माफक दरांत उपलब्ध करुन दिला आहे.  या योजनेद्वारे दररोज कामासाठी किंवा मनोरंजनासाठी जिओचे इंटरनेट वापरणाऱ्यांची  संख्या मोठी आहे.

फेसबुक-जिओ नवी योजना आणण्याची शक्यता

देशात फेसबुक वापरणाऱ्यांची  संख्या ४० कोटींच्या घरात आहे. ही संख्या जिओमुळे भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे फेसबुकने जिओमध्ये  गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच फेसबुक आणि जिओ संयुक्तपणे आकर्षक योजना सादर करण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅपलाही मोठा फायदा होण्याची शक्यता

फेसबुक-जिओ करारामुळे व्हॉट्सअॅपलाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. रिलायन्स रिटेलचे जिओ मार्ट व्हॉट्सअॅप बिझनेस तसेच व्हॉट्सअॅपच्या युपीआय पेमेंट  पर्यायाच्या मदतीने रिटेल मार्केटमध्ये (किरकोळ विक्रेत्यांची बाजारपेठ) मोठा विस्तार करण्याची शक्यता आहे. या विस्तारातून जिओ अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. 

भारतात ६० कोटी नागरिक इंटरनेट वापरतात

भारतात सध्या ६३ कोटींपेक्षा जास्त नागरिक इंटरनेटचा वापर करतात. यात पुरुषांचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे भारतातील युझरपैकी बहुसंख्य नागरिक व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, फेसबुक मेसेंजर आणि यु ट्युबचा वापर करण्यासाठी इंटरनेट  वापरतात.

Best IT Comany In Maharashtra , Solapur