नवी दिल्ली: देशात लॉकडाऊन सुरू असले तरी लोकांच्या अडचणी समजून घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने विशिष्ट व्यवसायांना सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने, पीठाच्या गिरण्या, प्रीपेड मोबाईल रिचार्ज करण्याची दुकानं, पंख्यांची दुकानं, किराणा मालाची तसेच औषधांची दुकान आणि दूध तसेच फळे आणि भाजीचे विक्रेते यांना परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची पुस्तके विकणाऱ्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे.
फळांची आयात-निर्यात, कृषी आणि फळबाग उत्पादन करणाऱ्या संशोधन संस्थांना, मध उत्पादनाला आणि विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात कृषी, अन्न प्रक्रिया, विशेष आर्थिक क्षेत्र, आयात-निर्यात क्षेत्र यांनाही परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्ते बांधणी, सिमेंट उद्योग, वीट भट्टी उद्योग यांनाही परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टंस पाळून व्यवसाय करण्याचे बंधन सगळ्यांवर लागू असेल. जे क्षेत्र हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमध्ये नाहीत तिथेच उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे.
व्यापारी जहाजांवर नोकरी करणाऱ्या भारतीय नागरिकांना वैद्यकीय तपासणी नंतर जहाजांवर जाण्याची परवानगी मिळणार आहे. या संदर्भात सरकारने निर्देश दिले आहेत. त्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे बंधन जहाजावर जात असलेल्या तसेच जहाजावरील काम संपवून परतत असलेल्यांसाठी असेल.
महागाई भत्ता जुलै २०२१ पर्यंत स्थगित
१ जानेवारी २०२० ते १ जुलै २०२१ या काळासाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारला २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३७,५३० कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. हा पैसा कोरोना संकटावर मात करण्यासाठी वापरला जाईल. केंद्रापाठोपाठ देशातील सर्व राज्यांकडूनही हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यांनी महागाई भत्ता स्थगित केल्यास देशाला कोरोना संकटावर मात करण्यासाठी अब्जावधींचा निधी उपलब्ध होईल. सर्व राज्यांची आर्थिक स्थिती बघता केंद्राच्या निर्णयाचे त्यांच्याकडून अनुकरण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राने केंद्राच्या निर्णयाचे अनुकरण केले तर राज्याचे ८२,५६६ कोटी रुपये वाचणार आहेत.

रेल्वे आणि नागरी विमान वाहतूक यांच्यावरील बंदी कायम
रेल्वे आणि नागरी विमान वाहतुकीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्राकडून रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी झाली होती. पण कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून ही बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
लॉकडाऊन संदर्भात २७ एप्रिलला महत्त्वाची चर्चा
देशात आतापर्यंत कोरोनाचे २१,७०० रुग्ण आढळले आहे. यापैकी ४३२५ जण बरे झाले आहेत तर ६८६ जणांचा मृत्यू झाला आहे. बाकीच्या १६,६८९ जणांवर उपचार सुरू आहेत. दररोज देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईच्या धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या २१४ झाली आहे. रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे ३ मे पर्यंतचे लॉकडाऊन पुढे वाढवायचे की नाही याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. हा निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व मुख्यमंत्र्यांशी २७ एप्रिलला चर्चा करणार आहेत.