लग्न आणि सेक्स – भाग २ ; वाचा सविस्तर-

0
519

लग्न आणि सेक्स – भाग २ सौ.सुधा पाटील, सांगली

8459730502

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या विषयावर कालच थोडं लिहिलं.बऱ्याच जणांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.खर तर हा विषयाचं गहन आणि सखोल आहे.त्यावर विचार मांडावेत तितके कमीच आहेत.पण आज भाग दोन मध्ये अजून थोडे विचार मांडण्याचा हा प्रयत्न!

कालचा लेख वाचून माझ्या डॉक्टर मैत्रिणीने मला दोन याबाबतची सत्य उदाहरणे सांगितली.ज्यांची ती स्वत: साक्षीदार आहे.पहिलं उदाहरण एका मुलीचं..ती मुलगी लग्न झाल्यावर माझ्या मैत्रिणीला भेटली पण नववधूचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नव्हताच.तीनं चौकशी केल्यावर ती मुलगी म्हणाली, लहानपणापासून सेक्स म्हणजे घाण, वाईट असंच मला सांगितलं गेलं आणि लग्न झाल्यावर हेच घाण करायचं.मला किळस वाटते.मला त्यात इंटरेस्ट नाही.

आता दुसरं उदाहरण…एक मुलगा त्याच्या आई व नववधूला घेऊन तपासायला माझ्या डॉक्टर मैत्रिणीनीकडे आला.तक्रार अशी की,ती नववधू नवऱ्याजवळ झोपायला तयार नाही.चौकशीअंती ती मुलगी म्हणाली, मला भीती वाटते.ते सगळं घाण वाटतं.असं म्हणून ती मुलगी रडायला लागली.कशीतरी समजून सांगून,तिला थोडा वेळ द्या असं तिच्या नवऱ्याला व सासूला समजावून पाठवलं.जाताना ते दोघे त्या नववधूला ओरडतच होते.पण दुसऱ्या दिवशी समजलं की,त्या मुलीनं आत्महत्या केली.खरचं धक्का बसला ही उदाहरणे ऐकून!

खरंच विचार करायला हवा.मी लहानपणी एक वाक्य ऐकलं होतं.असचं कोणाच्यातरी तोंडून…. मुलं ही आई-वडीलांच्या वासनेतून जन्माला येतात.तेव्हा काहीच कळलं नाही.पण ते वाक्य मनावर कोरलं गेलं होतं.मोठेपणी अर्थ समजायला लागल्यावर हेच वाक्य मी मैत्रिणींमध्ये खुपदा चर्चेला घेतलं.पण अशीच वरवरची चर्चा झाली.मागेच या विषयावर लिहावं वाटलं पण तोच सामाजिक पगडा आणि भीती! आणि तेव्हा लेखणी अजून धारदार आणि धाडसी नव्हतीच.पण एकविसाव्या शतकात आम्ही खूप शिकलो.पण आम्हाला अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक समस्या सोडवता नाही आल्या.पण समस्येचं मूळ शोधल्याशिवाय समस्या कधीच संपत नाहीत.एखाद्या मुरलेल्या रोगासारखी ही दबलेली समस्या सतत डोकं वर काढत राहते.म्हणूनच योग्य वेळी योग्य ती काळजी आजार होऊच नये म्हणून घ्यायची असते.

खरंच प्रेमापोटी अपत्ये जन्माला येतं असती तर आज मुलींचे गर्भ पाडले गेले नसते.कचरा कुंडीत कोवळे अंकुर सापडले नसते.अनौरस बालके अशी लेबलं काही मुलांवर दिसलीच नसती.अनाथाश्रमे ओस पडली असती.असो…ही पण एक भयानक सामाजिक समस्या आहेच.
सेक्स लाईफचा नैतिक मार्ग म्हणून आपण या लग्न संस्थेकडे पाहतो.पण या संस्थेच्या दुबळेपणामुळे पाश्र्चात्य संस्कृती बोकाळत आहे.अनेक तरुण पिढीला लग्न नकोच आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप संस्कृती बोकाळत आहे.पण का?याचा कुठेतरी विचार करायला हवा.एकीकडे आम्ही मुलींना सेक्स घाण असतो, वाईट असतो असे संस्कार करतो.आणि लग्न झालं की, फुलांनी सजवलेल्या पलंगावर तिला तेच करायची ही सुरुवात असं सांगतो.किती हा विरोधाभास!या अज्ञानामुळे कितीतरी कळ्या कोमेजून गेल्या असतील! कित्येक जीव आधी घुसमट सहन करून नंतर पर्याय नाही म्हणून परिस्थितीला शरणही गेले असतील.काळाच्या भयानक गर्तेत असंख्य कहाण्या लपल्या असतील.

पण या विज्ञान युगात पुन्हा अशा कहाण्या तयार होऊ नयेत म्हणून आपणच काळजी घ्यायची आहे.कारण आपणही या समाजाचे जागरूक घटक आहे.म्हणूनचं विवाह संस्था बळकट करण्यासाठी आजच्या तरुण पिढीला विवाहपूर्व समुपदेशन करायलाच हवं.पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या बाईला आधार नसल्याने लग्नं टिकवली जायची.पण आज काळ बदलला आहे.मुलंमुली क्षणात घटस्फोट घेतात.यातूनही झालेल्या मुलांचे प्रश्र्न, त्यांच्या मनावर होणारा परिणाम या पुढच्या समस्या आहेतच.

या सर्व सामाजिक समस्या येऊच नयेत यासाठी लग्न म्हणजे काय? सेक्स म्हणजे काय?याची माहिती मुलामुलींना द्यायलाच हवी.तरच बलात्कार, अनैसर्गिक सेक्स अशा समस्यांना आळा बसेल.आमच्या मुलींना सुहागरात म्हणजे सजवलेला पलंग, मस्त नटणं सजणं म्हणजेच लग्न असं वाटतं.आजकालच्या मुलामुलींना सोशल मिडियामुळे बरीच माहिती मिळते.पण तीही अर्धवट आणि चोरून त्यामुळे वेगळ्याच समस्या निर्माण होतात.

म्हणूनच विवाहपूर्व समुपदेशन करणाऱ्या संस्था बळकट करायला हव्यात.आमच्यावेळी असं कुठे काय होतं?असे फालतू प्रश्न उभा करण्यात काहीच अर्थ नाही.आपली पिढी अज्ञानातच वाढली.वाढत आहे, सेक्स ही एक नैसर्गिक गरज असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे त्यातील समस्या गाढायच्या! यातूनच समस्या वाढत जातात आणि कधीही न सुटणारा गुंता तयार होतो.आजची पिढी तडजोड करून संसार टिकवणारी नाही.मुली स्वावलंबी झाल्या आहेत.पूर्वी बाईला जगण्यासाठी माहेर किंवा सासर हाच आधार होता.बाईची वाईट अवस्था ही की,दिल्या घरीच मर!सर्व चांगलं असलं तर ठिक नाहीतर बाई मरायचीच! वाईट वाटतं की,जन्मदाते सुद्धा त्रास सहन कर पण तिथेच मर असं मुलीला म्हणायचे.

आजही काहीजण तसंच म्हणतात.कारण आपली सामाजिक परिस्थिती, सामाजिक संस्कार.पण जीवांशी खेळणारे संस्कार काय कामाचे?पण आज तशी परिस्थिती नाही.स्वत:च्या बायकोला छळणारा पुरुषही माझ्या मुलीला जपणारा जावई हवा असं म्हणतोच.हे वास्तव आहे.आणि म्हणूनच लग्न या संस्थेचा पायाच असणाऱ्या सेक्सची शास्त्रशुद्ध़ माहिती सर्व वयोगटातील मानव जातीला दिलीच पाहिजे.अगदी प्रेमात अखंड बुडालेली,एक दुजे के लिये असं म्हणणारी मुलं-मुली देखील सेक्स लाईफ असमाधानी असेल तर घटस्फोट घेतात.मग प्रेम गेलं कुठे?

खरंच जरा वास्तव समजून घेऊया.भूक असह्य झाली की अगदी सभ्य माणूसही मागून किंवा चोरून खातोच! समाजात अनेक चोर निर्माण होतात ते केवळ गरजा अपुऱ्या राहतात म्हणूनच.कोणीही मानव मूळचा चोर नसतोच.अशा अनेक समस्या संपवायच्या असतील तर सेक्स हा विषय मोकळेपणाने समाजापुढे बोलून निकोप समाज निर्मितीसाठी प्रयत्न केला पाहिजे.आणि मुख्य म्हणजे स्त्रीयांना यांत गौण समजणं म्हणजे मुर्खपणाचा कळस होईल.कारण आजकाल मुली महिलांवरील अत्याचार पाहून लग्नंच नको म्हणत आहेत.अस झालं तर काय होईल याचा विचार करा.सारीत तरुण पिढी लिव्ह इन रिलेशनशिप या संस्कृतीचा विचार करू लागली तर समाज किती धोक्यात येईल? यासाठीच स्त्री आणि पुरुष यांच्या उत्तम समायोजनाशिवाय उत्तम लग्न संस्था निर्माण होऊच शकत नाही.म्हणूनच सारासार विचार करून आपणच आपला समस्या सोडवून एक विचारशील समाज निर्माण करूया.

हा विषय नाजूक समजून अनेक समस्या दाबल्या जातात.यातूनच अनेक मनोविकृतींचा जन्म होतो आहे.आणिआपल्या समाजात मानसिक आरोग्य, मानसिक आजार याकडे दुर्लक्ष केलं जातं.कुटुंबात अनेक मानसिक आजार हे सेक्स मधील असमाधान हेच आहे.त्यात महिला वर्ग तर तोंड दाबून बुक्क्यांचा मारच सहन करतो.सेक्स ही ओरबाडून खायची गोष्ट नाहीच.खरं वैवाहिक आयुष्य सुंदर करायचं असेल तर नवरा बायको दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या गरजा पूर्ण करायला हव्यात.एकीकडे बाई म्हणून तिचा अपमान करायचा आणि दुसरीकडे तिनं रात्री सारं विसरून पुरुषाला खुश करायचं अशी विचारसरणी असेल तर…अशक्य!

कारण सेक्स हा मनांचा असतो.शरीर हे केवळ एक माध्यम असतं.म्हणूनच प्रेमाला, भावनांच्या ओलाव्याला महत्त्व आहे.हे ज्यांना कळतं त्यांचेच संसार एक दुजे के लिये बनतात.अन्यथा केवळ सामाजिक तडजोडी! आणि तडजोड म्हंटले की तिथं व्रण,यातना,असाह्यता आलीच.तिथं कुठे असणार प्रेमाचा अंकुर! म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीला वेळीच आपण सावरूया.

Best IT Comany In Maharashtra , Solapur