सोलापूर शहरात गेल्या दोन महिन्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या 40 जणांची नोंद महापालिकेच्या अहवालात नोंद करण्यात आली नव्हती.यामुळे शहर जिल्ह्यात खबबळ उडाली होती. या नोंदी अपडेट करून घेण्यात आल्या आहेत. आजच्या अहवालात करण्यात येत आहे अशी माहिती आज सोमवारी रात्री महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन दिली.

रुग्णालय आणि महापालिका प्रशासन यांच्यातील कम्युनिकेशन गॅप मुळे बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेता आली नाही असेही महापालिका आयुक्त यांनी सांगितले.

कोरोना संकटाने सोलापूर शहराला अलगदपणे आपल्या मगरमिठीत घेतल्याचे रोजची आकडेवारी सांगते आहे. कोरोनाची साखळी तोडण्यात अपयश आल्याचाच हा परिणाम आहे. त्या अपयशाचे धनी जेवढे प्रशासन आहे. तेवढेच बेफिकीर आणि बेजबाबदार सोलापूरकर देखील आहेत, हे नाकारता येणार नाही.दोनशेहून अधिक बळी पडले तरी आपण जागे होणार नाहीत का? हा प्रश्न सुज्ञ सोलापूरकरांनी स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे.

राज्य सरकारने अनलॉक 1 केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शहरातील लोक घराबाहेर पडत आहेत. मास्क वापरत नाहीत, सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. दुकानदारही आपली जबाबदारी पार पाडत नाहीत असं निदर्शनास येत आहे. संबंधितांवर पोलिस आणि महापालिका यंत्रणा कारवाई करेलच पण अशी स्थिती राहिली तर पुन्हा लॉक डाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा सुचित इशारा पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिला आहे.