राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला आहे, बुधवारी सकाळी आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात बाधितांचा आकडा हा आता ३२० वर पोहोचला आहे. बुधवारी सकाळपर्यंत मुंबईत १६ तर पुण्यात २ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
मंगळवारी राज्यात कोरोनाचे तब्बल ७२ रुग्ण आढळले होते. काल दिवसअखेरीस हा आकडा ३०२ होता. त्यात मुंबईत ५९ , अहमदनगरमध्ये ३, पुण्यात २, ठाण्यात २, कल्याण-डोंबिवलीमध्ये २, नवी मुंबईत २, विरारमध्ये २ रुग्ण आढळले होते. मुंबईत कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या ही वाढतच चालली आहे. मुंबईत रुग्णांचा आकडा हा सर्वाधिक आहे अशी माहिती आरोग्य विभागानं काल दिली होती.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण अधिक असल्यानं गेल्या काही दिवसांत इथले १४६ परिसर मुंबई महानगर पालिकेनं सील केले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती.