राज्यातील भूमीपुत्रासाठी शासन स्थापन करणार “कामगार ब्युरो”
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: सध्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक परप्रांतीयांना आपले गाव गाठण्याचा निर्णय घेऊन मोठ्या शहरातून कोरोनाच्या धास्तीने पलायन केले आहे. याच संधीचा फायदा घेऊन भूमीपुत्रांना महाराष्ट्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्याचा मानस शासनाने आखला आहे. या संधी मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

आज राज्यातील अनेक शहरांमधून आणि जिल्ह्यांमधून आपला संसार गुंडाळून परप्रांतीय मजूर आपले गाव गाठत आहे. यामुळे इथल्या उद्योगांसमोर एक नवे संकट उभे राहिले आहे. आता इथल्या उद्योगांना मजूर आणि कामगारांची कमतरता जाणवणार आहे. खरं तर उद्योगांसमोर कोरोनामुळे उभी राहिलेली ही अडचण राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची संधी घेऊन आली आहे. भूमिपुत्रांना या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे.
राज्यातील उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास विभागातर्फे या कामगार ब्यूरोची स्थापना केली जाणार आहे. या कामगार ब्यूूरोकडे नोंदणी करणाऱ्या कामगारांची कुशल, अकुशल तसंच कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. यानंतर कामगारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि उद्योगांच्या गरजेनुसार नोंदणी केलेल्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.