येणाऱ्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे – आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई, १२ जून: कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत तर कुणाचीही चाचणी करण्याची गरज नाही असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. येणाऱ्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे. त्यामुळे आपली काळजी आपण घेऊनच आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ बैठक, वर्धापन दिन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक प्रकारच्या तक्रारीकडे सरकारचं बारकाईनं लक्ष आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

धनंजय मुंडेंवर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. १० दिवसांमध्ये ते पुन्हा सक्रिय होतील असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. काल एका दिवसात तब्बल ३ हजार ६०७ नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजार ६४८ वर पोहोचली आहे. तसेच काल १ हजार ५६१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर १५२ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ४६ हजार ०७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनाबळींची संख्या ३ हजार ५९० इतकी झाली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. मुंबईत काल दिवसभरात १ हजार ५६७ नव्या रुग्णांची भर पडल्याने येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५२ हजार ४४५ वर पोहोचली आहे. तर एका दिवसात ९७ जणांनी कोरोनामुळे जीव गमावल्याने कोरोनाबळींची संख्या १ हजार ८५५ वर पोहोचली आहे.