मुंबई | ऊसतोड मजूर कामगारांसाठी एक मोठी बातमी आहे. लॉकडाऊच्या काळात जिल्ह्याजिल्ह्याच्या ठिकाणी घराबाहेर अडकलेल्या कामगारांना लकरच घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आपल्या ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली आहे.

यात त्यांनी म्हंटल आहे की माझ्या ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर आहे. तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा.
राज्यात करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे ऊसतोड कामगार हे ठिकठिकाणी अडकून पडले होते. राज्यात कोरोनाचा वाढता कहर बघता कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


राज्यातील साखर कारखाने, विविध जिल्ह्यातील निवारागृहे यांसह ठिकठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांना त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या पशुधनासहित मूळ गावी परतण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. त्यावर आता सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्यात सुरू असलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे बीड, अहमदनगरसह इतर जिल्ह्यातील दीड लाखांहून अधिक ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भाग व अन्य ठिकाणी अडकून पडलेले आहेत. काही साखर कारखान्यांनी राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांची तात्पुरती निवास, भोजन आदी व्यवस्था केली आहे.

तर काही कारखाने बंद झाल्यामुळे गावी परत निघालेले ऊसतोड मजूर विविध जिल्ह्यांमध्ये अडकून पडले असून स्थानिक प्रशासन त्यांना मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र आता त्यांना स्वगृही पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.