मेरा आंगण मेरा रणांगण भाजपाचे ठाकरे सरकार विरोधात आंदोलन
ग्लोबल न्यूज: राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.


याच पार्श्वभूमीवर “मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव” अशा प्रकारची भूमिका घेऊन येत्या 22 तारखेला भारतीय जनता पार्टी ठाकरे सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेने आपल्या घराबाहेर येऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “22 तारखेला मेरा अंगण मेरा रणागंण महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आपल्याला आपल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून राज्य सरकारचा निषेध करावा. यावेळी निषेध व्यक्त करणारं रिप्लेक्शन म्हणून काळे बोर्ड, काळे टी शर्ट, काळी रीबीन, काळे मास्क, काळे शर्ट, काळ्या ओढण्या अशा गोष्टींचा वापर करावा.
महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण 9 मार्चला सापडला. त्याच दिवशी केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला. केरळाची संख्या 70 दिवसात 1 हजार क्रॉस झालेली आहे आणि महाराष्ट्रातील 70 दिवसाची संख्या ही 40 हजार झाली आहे. केरळमध्ये मृतांची संख्या 12 क्रॉस झालेली नाही. पण महाराष्ट्रातली मृत्यूची संख्या 1300 क्रॉस होऊन 1400 कडे निघाली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे उदाहरण आहे”, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.