मुस्लिम धर्मीयांच्या पविञ रमजान महिन्याला आजपासून प्रारंभ
मुंबई – मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला चंद्रदर्शनानंतर आज शनिवार, २५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात येणारे हे रोजे रोजेदारांची चांगलीच कसोटी पाहणारे ठरणार आहेत.
एरवी रमजानचा महिना म्हटलं की प्रार्थनांचा महिना, पवित्र महिना, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये भाविकांची गर्दी व उत्साह दिसून येतो. यंदा मात्र कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रथमच रमजानच्या महिन्यात मशिदीही सुन्यासुन्या दिसणार आहेत. मुस्लीम समाजामध्ये वर्षाच्या १२ महिन्यांपैकी रमजानचा महिना विशेष पवित्र मानला जातो.

याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ कुराण अवतरीत झाल्याचे सांगितले जाते. प्रत्येक मुस्लीम स्त्री पुरुषांवर धर्मानुुसार ज्या पाच गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे रमजान महिन्याचे ३० रोजे (उपवास) ठेवणे बंधनकारक आहे. वर्षाच्या प्रत्येक ऋतूत १२ महिने येणारे हे रोजे मागील दोन वर्षांपासून उन्हाळ्यात येत आहेत. उन्हाळ्यातील रोजे हे रोजेदारांची खरी कसोटी पाहणारे ठरत असतात. कारण रोजा ठेवल्यानंतर संपूर्ण दिवसभर तब्बल १४ तास अन्नपाण्यावाचून राहावे लागते.
ऋतू कोणताही असो मुस्लीम समाजातील सात वर्षाच्या मुलांपासून आबालवृद्ध रोजे धरतात. रमजान महिना म्हटला की, पहाटेच्या सहरपासून संध्याकाळी इफ्तारपर्यंत भाविकांच्या उत्साहाला एकच उधाण आले असते. मात्र यावर्षी रमजानच्या महिन्यावरही कोरोनाचे सावट असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. तरीही आपापल्या घरात राहून रमजानमधील सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी तयारी केली आहे.