मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डिसेंबर 2020 पर्यंत एमडी आणि एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर कोरोना साथीच्या रोगाचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यामुळे डिसेंबर 2020 पर्यंत एमडी/एमएस परीक्षा पुढे ढकलण्यास भारतीय मेडिकल कौन्सिलला निर्देश द्यावेत, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे.

दरवर्षी मे/जून महिन्यात होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या असून त्या 15 जुलै नंतर घेण्याचा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा प्रस्ताव आहे. अंतिम वर्षातील एमडी एमएसचे अनेक विद्यार्थी निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका दवाखाने तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड -19 रुग्णांवर उपचारासाठी तसेच क्लिनिकल व्यवस्थापनास मदत करण्यात आघाडीवर आहेत.
जर त्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या तर या अत्यंत महत्त्वाच्या काळात प्रशिक्षित डॉक्टरांची कमतरता भासेल, असे पत्रात म्हटले आहे.