मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी सुचवण्यात आलं आहे. कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या दोन जागा आहेत, त्यातील रिक्त असलेल्या एका जागेवर उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

विधानपरिषद निवडणूक लांबणीवर गेलेली असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नावाची राज्यपाल कोट्यातून शिफारस करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडली. यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
राज्यपाल नियुक्त सध्या दोन जागा रिक्त आहेत. त्यातल्या एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिफारस केली गेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवरचं आलेलं मोठं संकट टळलेलं आहे.

मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आतमध्ये संविधानानुसार कोणत्यातरी एका सभागृहाचं सदस्यत्व असणं बंधनकारक असतं. नाहीतर तुमचं पद धोक्यात येऊ शकतं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन 5 महिने झाले होते. कोरोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडली होती. साहजिक ठाकरे सरकारसाठी ती धोक्याची घंटा होती. मात्र उद्धव यांचा विधानपरिषदेवर जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
दरम्यान, आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उद्धव यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे. लवकरच ते विधानपरिषदेचं सदस्यत्व स्विकारतील.