मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकी विषयी छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. वाचा काय म्हणाले भुजबळ…
सध्या देशात कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना सोबतच अजुन एक विषय सर्वात जास्त चर्चेत आहे तो म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदारकी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना ६ महिन्याची मुदत संपेपर्यंत म्हणजेच २७ मे पर्यंत अगोदर कुठल्याही एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागणे बंधनकारक आहे.

कोरोनामुळे देशातील सर्व निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या असल्या कारणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदार केले जावे अशी शिफारस महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळाने केली आहे. मात्र अनेक दिवसांपासून या शिफारसीवर राज्यपालांनी निर्णय न घेतल्यामुळे आता याविषयावर राजकारण चालू झालं आहे.

राज्याचे कॅबीनेट मंत्री छगन भुजबळ यांनी देखील याविषयी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यास कुठलीही अडचण येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ” कुठल्याही राज्याचे राज्यपाल हे अशा पद्धतीने कोणाची अडवणूक करु शकत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेएक व्यंगचित्रकार , फोटोग्राफर, संपादक आहेत. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सगळ्या नियमात उद्धव ठाकरे बसत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या भयानक संकटात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये.”

याअगोदर भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदार करण्याविषयी आक्षेप घेतला होता. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तसं जाहीर पणे बोलूनही दाखवलं होतं. मात्र मंत्रीमंडळाची शिफारस ही राज्यपालांना बंधनकारक असते आणि राज्यपालांच्या कोट्यातल्या आमदारांच्या जागा या कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक उत्तम छायाचित्रकार आहेत, सामनाचे संपादक राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आमदार करण्यात काही अडचण येणार नाही असं घटना तज्ञांचं म्हणणं आहे.

आता या विषयावर राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.