मुंबई कोरोना कडेलोटाच्या टोकावर? टास्क फोर्स प्रमुख म्हणतात की..
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे १५,५३५ रुग्ण आहेत. यातले एकट्या मुंबईत ९,९४५ जणांना कोरोना झाला आहे. कोरोनाची ही आकडेवारी बघता मुंबई कडेलोटाच्या टोकावर उभी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

‘कोरोनासारख्या आजारांच्या काळात एक पॅरोबोलिक कर्व्ह आहे. आपण त्याच्या वरच्या टोकाच्या थोडे आधी आहोत. पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी काही केस वाढणार आहेत,’ अशी भीती डॉक्टर संजय ओक यांनी झी 24 तास वाहिनी शी बोलताना व्यक्त केली.
‘धारावीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले, यामध्ये ज्यांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांच्या रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण कमी आढळलं आहे. हे रुग्ण गंभीर असल्याचं आढळून आलं आहे, मात्र आपण अनेकांना वाचवण्यात यशस्वी ठरलो आहोत. धारावीमध्ये ज्या समस्या आहेत, त्याच मालेगावमध्येही आहेत. जागेची मर्यादा, घरात जास्त लोकं असणं, कमी जागेत जास्त लोकसंख्या, या सगळ्या अडचणी धारावी आणि मालेगावमध्ये आहेत,’ असं डॉक्टर संजय ओक म्हणाले.

‘मुंबईतील बेडची संख्याही आपण वाढवत आहोत. पण स्वतंत्र आणि लालफितीचा अडथळा नसलेलं आरोग्य प्राधिकरण निर्माण करण्याची वेळ आली आहे. हे सगळं संपल्यावर MMRDA-MSRDCच्या धर्तीवर असं आरोग्य प्राधिकरण तयार केलं पाहिजे, असा सल्ला डॉक्टर संजय ओक यांनी दिला.

‘भविष्यकाळात आरोग्यासाठी जीडीपीच्या किमान ७ ते ८ टक्के खर्च केला पाहिजे. अमेरिकेमध्ये जीडीपीच्या १७-१८ टक्के खर्च आरोग्यावर केला जातो,’ असं डॉक्टर संजय ओक यांनी सांगितलं
‘सुरुवातीला आपण व्हॅन्टिलेटरच्या मागे गेलो, पण आता ते करण्यापेक्षा मास्कद्वारे ऑक्सिजन द्यायला आपण सुरु केलं. आजारावर उपचार करण्याची प्रक्रिया आपण बदलली. कोरोना जाणार नाही, पण त्याची तीव्रता कमी राहिल. असं असलं तरी इतर संसर्गजन्य आजारात कोरोना पहिल्या क्रमांकावर राहिल,’ अशी भिती व्यक्त केली.

‘आपल्याला अजून बराच पुढचा पल्ला गाठायचा आहे. युरोप-अमेरिकेने ज्या चुका केल्या, त्या आपण केल्या नाहीत. नागरिकांनी लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी करणं यातच आजारावर मात करण्याचा मार्ग आहे. वुहान ७२ दिवसांनी उघडलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सिंगापूरसारख्या देशांवर आधी व्यवहार सुरू केल्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली, त्यामुळे आपणही स्लो गेलं पाहिजे. मद्यविक्रीची दुकानं बंद ठेवली पाहिजेत. अमेरिका आणि युरोप म्हणजे सर्वोत्तम हे कोरोनामुळे मोडित निघालं,’ असं वक्तव्य ही डॉक्टर संजय ओक यांनी केलं.
आत्तापर्यंत आरोग्य यंत्रणेला धन पुरवठा केलेला नाही. अमेरिकेमध्ये जीडीपीच्या १७-१८ टक्के खर्च आरोग्यावर होतो. आपण ७ ते ८ टक्क्यांपर्यंत पुढच्या काळात खर्च केला पाहिजे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर आपण एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या धर्तीवर आरोग्य प्राधिकरण तयार केलं पाहिजे. स्वतंत्र आणि लालफितीचा अडथळा नसलेलं आरोग्य प्राधिकरण निर्माण करण्याची गरज आहे, असं मत डॉक्टर ओक यांनी मांडलं. तसंच पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी ग्रीन झोनमधील डॉक्टर आणि यंत्रणा आली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.