गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीसंदर्भात निरनिराळ्या अफवा समोर येत आहेत. आता स्वत: अमित शहा यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
मी पूर्णपणे बरा असून मला कोणत्याही प्रकारचा आजार नाही, अशी माहिती ट्विट करून अमित शहा यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या संकट काळात रात्री उशिरापर्यंत काम केल्यामुळे त्याने या सर्वांकडे लक्ष दिलं नसल्याचे म्हटलं आहे.



अमित शहा म्हणाले, ‘गेल्या कित्येक दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियातून माझ्या आरोग्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या आहेत. इतकंच काय तर काही लोकांनी ट्वीट करून माझ्या मृत्यूसाठी प्रार्थनाही केली आहे. माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी आणि माझ्या हितचिंतकांनी गेल्या दोन दिवसांपासून माझ्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या चिंतेकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणूनच आज मी हे स्पष्ट करत आहे की, मी पूर्णपणे बरा आहे आणि मला कोणताही आजार नाही.’

अमित शहा पुढे म्हणाले की, ‘हिंदूंच्या मान्यतेनुसार असा विश्वास आहे की, अशा अफवामुळे आरोग्यास बळकटी मिळते. माझ्या प्रकृतीविषयी विचारपूस केल्याबद्दल मी माझ्या सर्व हितचिंतक आणि पक्षातील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. ज्या लोकांनी या अफवा पसरविल्या आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकराचा द्वेष नाही.’
