मिरज ते गोरखपूर विशेष ट्रेनचा खर्च मंत्री विश्वजीत कदम उचलणार
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: मिरजेतून रविवारी रात्री परप्रांतीय कामगार आणि मजुरांसाठी गोरखपूर विशेष रेल्वेगाडी रवाना होणार आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी प्रवासखर्चाची व्यवस्था करणार असल्याने गरीब मजुरांना दिलासा मिळाला आहे.

गोरखपूरला मिरजेतून दोन रेल्वेगाड्या जाणार आहेत. यापैकी पहिली गाडी आज रवाना होईल. जिल्ह्यात हजारो परप्रांतीय मजूर गावाकडे जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी उत्तर भारतीयांची संख्या मोठी असल्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूरपर्यत मिरजेतून विशेष रेल्वे सोडण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

या विशेष रेल्वेचे प्रत्येकी साडेनऊ लाख रुपये भाडे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम देणार स्वतः भरणार आहेत. रविवारी रात्री मिरज रेल्वे स्थानकातून पहिली रेल्वे रवाना होईल. मिरजेतून थेट गोरखपूरपर्यत जाणारी रेल्वे वाटेत कोठेही थांबणार नाही किंवा कोणत्याही प्रवाशाला वाटेत उतरू देण्यात येणार नाही.

उत्तर प्रदेशातील अन्य जिल्हयातील प्रवाशांना गोरखपूरातून स्थानिक प्रशासन अन्यत्र पाठविण्याची व्यवस्था करणार आहे.
राज्याच्या विविध भागातून सध्या परराज्यातील मजुरांसाठी रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत. काल रात्रीच पुण्यातून लखनऊसाठी रेल्वे रवाना झाली.
या ट्रेनमध्ये १०३१ प्रवासी होते. पुणे जिल्हा प्रशासनाकडून या प्रवाशांसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रवाशांसाठी बसण्याची चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात येत होती