मुंबई : देवाचं आणि धर्माचं राजकारण गेल्या अनेक वर्षापासून प्रिय आहे किंबहुना त्याच मुद्दांवर शिवसेना राजकारण करत असते मात्र आज शिवसेना किती बदललीये? याचं मूर्तीमंत उदाहरण आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी दाखवून दिलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर’देवांनी मैदान सोडलं’ या मथळ्याखाली सामनाचे कार्यकारी संपादक संजय 3राऊत यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा चालवत प्रबोधनात्मक अग्रलेख लिहीला आहे.
कोरोना विषाणूचा कहर असा की, सगळेच शक्तिमान देश जणू मरून पडले. मक्केपासून व्हॅटिकनपर्यंत, बुद्ध गया मंदिरांपासून ते शिर्डी, सिद्धिविनायकापर्यंत सर्वत्र ‘सन्नाटा’ पसरला आहे. माणसांवर येणाऱ्या प्रत्येक संकटप्रसंगी ईश्वर सर्वप्रथम मैदान सोडून जातो. कोरोनामुळे धर्म, ईश्वर सगळेच निरुपयोगी झाले आहेत, असं वास्तव सांगणारं चित्र राऊत यांनी आजच्या अग्रलेखातून रेखाटलं आहे.
वाचा आजचा रोखठोक
कोरोना विषाणूचा कहर असा की, सगळेच शक्तिमान देश जणू मरून पडले. मक्केपासून व्हॅटिकनपर्यंत, बुद्ध गया मंदिरांपासून ते शिर्डी, सिद्धिविनायकापर्यंत सर्वत्र ‘सन्नाटा’ पसरला आहे. माणसांवर येणाऱया प्रत्येक संकटप्रसंगी ईश्वर सर्वप्रथम मैदान सोडून जातो. कोरोनामुळे धर्म, ईश्वर सगळेच निरुपयोगी झाले. कोरोना व्हायरसच्या विळख्यात जग तडफडताना दिसत आहे. जगाची इतकी तडफड दुसऱया महायुद्धातही दिसली नव्हती. स्वतःस ‘सुपर पॉवर’ समजणारे बहुतेक सर्व देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. चंद्रावर आणि मंगळावर ‘पाय’ ठेवणाऱया अमेरिकेत राष्ट्रीय आपत्ती आणि आणीबाणीच जाहीर केली आहे. साऱया जगावर एकेकाळी राज्य करणाऱया ग्रेट ब्रिटनने तर स्वतःला कोंडून घेतले आहे.
सम्राज्ञी एलिझाबेथ यांना त्यांच्या राजप्रासादातून ‘वेगळे’ केले आहे. अनेक मोठय़ा देशांत हे घडत आहे. निसर्गाने मानवी अहंकाराचा, देव-धर्माचा केलेला हा पराभव आहे. संकटकाळी माणूस देवाला शरण जातो. कोरोनामुळे उलटेच झाले आहे. धर्म हा तर सध्याच्या राजकारणाचे सगळय़ात मोठे भांडवल झाले आहे, पण ‘कोरोना’ प्रकरणात स्वतः देवांनाच विषाणूंपासून संरक्षण द्यायची वेळ आली. हिंदू, इस्लामी, बुद्ध असे सर्वच धर्मीय देश जणू मरून पडले आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ‘देवळे’ कोरोनाच्या भीतीने बंद करावी लागली. भक्तांचा ओघ आहे म्हणून मंदिरातील दगडी मूर्तींना देवत्व प्राप्त होते. भक्तांचा ओघच थांबला. त्यामुळे कसले देव आणि कसले देवत्व? महाराष्ट्रात ‘कोरोना’ व्हायरस वाढू नये म्हणून सिद्धिविनायक मंदिर बंद केले. तुळजापूरचे भवानी मातेचे मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, त्र्यंबकेश्वरचे मंदिर बंद केले आहे. शिर्डीत शुकशुकाट आहे.
मुंबईतील बाबुलनाथ मंदिर बंद करण्यात आले आहे. देवांनी अनेक असुरांचा वध केला असे पुराणात सांगितले गेले, पण एक विषाणू देवांवर भारी पडला.मक्का ते व्हॅटिकनमक्केपासून व्हॅटिकनपर्यंत आणि बालाजीपासून बुद्ध गया मंदिरापर्यंत ‘कोविड-19’ म्हणजे कोरोनाने सिद्ध केले की, माणसांवर येणाऱया प्रत्येक संकटप्रसंगी ईश्वर सगळय़ात प्रथम मैदान सोडून जातो, असे तस्लिमा नसरीनने नुकतेच म्हटले आहे.
मक्केत सर्व काही ठप्प आहे. पोपचा ईश्वराशी संवाद सध्या बंद आहे. पुजारी मंदिरातील मूर्तींना मास्क लावून धर्मकांड करीत आहेत. सर्वच धर्मांनी व त्यांच्या ठेकेदारांनी कोरोना व्हायरसने भयभीत मानवांना असहाय्य अवस्थेत निराधार करून सोडून दिले आहे. त्याच धर्मासाठी हिंदुस्थानसह जगभरात रक्तपात आणि हिंसाचार होतो, पण ‘कोरोना’च्या हल्ल्यातून एकही धर्म वाचला नाही. यातून कोणी शहाणपण घेईल काय? मदिनेत पैगंबर मोहंमदांचे जेथे दफन झाले तेथील ‘तीर्थयात्रा’ स्थगित केली आहे.
या वेळी हजयात्राही कोरोनामुळे होईल काय ही शंकाच आहे. अनेक मशिदींत जुम्माचा नमाज स्थगित केला आहे. कुवेतमध्ये विशेष अजान करून लोकांना घरीच ‘इबादत’ करण्याचा आग्रह केला आहे. मौलवीसुद्धा आता ‘इस्लाम खतरे मे’ची बांग देताना दिसत नाहीत आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी मशिदीत जाऊन अल्लाकडे दुवा मागा असे सांगत नाहीत.

कारण त्या सर्वच धर्मांच्या ठेकेदारांना आता खात्री पटली आहे की, ‘अल्ला’ आता आपल्याला नॉव्हेल कोरोना व्हायरसपासून वाचवायला येणार नाही. फक्त वैज्ञानिकच वाचवू शकतील. जे व्हायरसवर ‘लस’ शोधण्याची शर्थ करीत आहेत. नवसाचे देव कोरोनाशी सामना करण्यात नवसाचे देवही तोकडे पडले. ‘गोमांस’ घरात ठेवणे हा धर्मद्रोह आहे असे ठरवून माणसे मारण्यात आली, पण जे गोमांस खात नाहीत तेसुद्धा ‘कोरोना’चे शिकार झाले.
महाराष्ट्रात गाडगेबाबांनी जे सांगितले तेच शेवटी खरे ठरले. नवस, आवस, देव-धर्म खरा नाही. मानवता हाच धर्म आहे हे सांगणारे गाडगेबाबा खरे. देवळात जाऊ नका. मूर्तीची पूजा करू नका. देवापुढे पैसा, फूल ठेवू नका. तीर्थी धोंडा पाणी! सत्यनारायण पुजू नका. पोथी पुराणातल्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका. प्राण्यांची हत्या करू नका. दारू पिऊ नका. सावकारांचे कर्ज काढू नका.
आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण द्या, असे गाडगेबाबा कीर्तनात सांगत. गाडगेबाबांनी कोणत्याही मूर्तीपुढे कधीच मान तुकवली नाही. ते विज्ञानवादी संत होते. नवस-आवस करून महामारी पळत नाही हे त्यांनी सांगितले. ते पुनः पुन्हा खरे ठरले. येशूनेही चमत्कार केला नाही. मक्का-मदिनाने चमत्कार केला नाही आणि देवही लोकांपासून वेगळे झाले. शेवटी विज्ञान व वैद्यकीय ज्ञानाच्या जोरावर माणसेच कोरोनाशी लढत आहेत. लोकांना घरी बसावे लागले. लोकांचा रोजगार गेला.
देवाच्या दानपेटीतला पैसा कमी झाला हे सत्य आहे, पण लोकांच्या मदतीला धर्माची कोणतीही शक्ती आली नाही. तोंडास फडके बांधावेच लागले व सॅनिटायझर नावाच्या द्रवाने हात सतत साफ करीत काम करीत राहावे लागले. शेवटी देव दगडाचाच आणि माणूसच खरा ! दीड कोटीना फटका कोरोना व्हायरसमुळे जगभरात एकूण दीड कोटी लोकांना फटका बसेल. मृत्यू मोठय़ा प्रमाणात होतील.
मंदी आणि आर्थिक अराजकातून खून, भूकबळी, गुन्हे वाढतील. अमेरिका, चीन, युरोपसारखे देश हतबल होतील. हिंदुस्थानात आर्थिक स्थिती डबघाईला येईल. निसर्गावर विज्ञानाने मात करणे अशक्य आहे. एक अज्ञात गूढ शक्ती विश्वाचे नियंत्रण करीत आहे. ती शक्ती म्हणजे ट्रम्प, मोदी किंवा चीनचे सत्ताधीश नाहीत. चीनच्या एका मासळी बाजारातून पसरलेला हा विषाणू जगाला भारी पडला आहे
आणि हे सर्व देश अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रे यांच्या स्पर्धेत धन्यता मानीत आहेत. कोरोना व्हायरस सुरू झाल्यापासून आपले पंतप्रधान मोदी यांना हिंदुस्थानातच अडकून पडावे लागले ही त्यातल्या त्यात लाभाची गोष्ट घडली. देशात संपत्ती नाही म्हणून देश भिकारी होतो किंवा देशात संपत्ती असूनही समान वाटणी झाली नाही म्हणजे देश भिकारी होतो.
आता ‘कोरोना’ या एका विषाणूमुळे देश व जग भिकारी बनताना दिसत आहे. देश, माणसे आणि आपापल्या धर्माचे सर्वोच्च देवही गरिबीच्या संक्रमणावस्थेतून जात आहेत. कोरोनामुळे शेअर बाजार साफ कोसळले. त्यात अंबानींपासून अदानीपर्यंत श्रीमंत थोडे गरीब झाले. तसे आमचे जगभरचे देवही गरीब झाले. भक्तांशिवाय नेते आणि देवांनाही श्रीमंती नाही. सिद्धिविनायकापासून तुळजापूरपर्यंत, मक्केपासून व्हॅटिकनपर्यंत देवांच्या दारी सन्नाटा आहे. कोरोना, हे काय केलेस?