मलकापुर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बार्शीत खाटीक समाजाचा मुक मोर्चा
बार्शी –
मलकापूर जि.बुलढाणा येथे खाटीक समाजाच्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलींवर अज्ञात आरोपींनी अत्याचार करुन तीचा खुन केलेच्या निषेधार्थ आज बुधवार दि. 22 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता बार्शी शहरातील सर्व खाटीक समाजातील महिला, पुरुष व कुटूंबियांतील सदस्यांनी एकत्रित येऊन भव्य मुक मोर्चा काढला.

या मोर्चाची सुरुवात मल्लपा धनशेट्टी रोड खाटीक गल्ली येथुन होऊन हा मोर्चा शहरातील जुने पोलिस स्टेशन, पांडे चौक, नगर पालिका, कसबा पेठ, कचेरी रोड मार्गाने तहसिल कार्यालयावर पोहचला. यावेळी नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की सदर घडलेल्या घटनेतील अज्ञात आरोपींना पकडुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, पिडित कुटुंबियांना सरकारी मदत तात्काळ मिळावी तसेच अज्ञात आरोपीविरुध्द भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या प्रकरणाची लवकरात लवकर सीबीआय यांच्या मार्फत तपास करून पिडितकुटुंबियांना न्याय मिळवुन द्यावा अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
सदरचा मोर्चा हा शांततेत शिस्तबद्ध काढण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या पुरुष व महिलांनी निषेध म्हणून काळया फिती लावल्या होत्या. सदर मोर्चास वंचित बहुजन आघाडी, छावा संघटना,जिजाऊ बिग्रेड, अखिल भारतीय नाथपंथीय डवरी गोसावी समाज, भुमाता ब्रिगेड, पत्रकार संघटना आदींसह विविध समाज संघटना व सामाजिक संस्थानी जाहीर पाठिंबा देत पत्र दिले. मोर्चास बार्शी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या .