पुणे: राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. अचानक वाढणारा गारठा, ढगाळ हवामान आणि पावसाची हजेरी अशी स्थिती विविध भागांत पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होते.
वेगवान वारे वाहत असल्याने काही भागांत गारठाही जाणवत होता. आज (ता. 10) आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, मराठवाडा आणि लगतच्या दक्षिण-मध्य महाराष्ट्रावर चक्रवाती वारे वाहत असल्याने येत्या २४ तासांत मराठवाडा तसेच लगतच्या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेट ने वर्तवली आहे.
गेल्या चार दिवसात वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव नागरिकांना येत आहे. दोन दिवस पडलेल्या थंडी नंतर आज उस्मानाबादेत ढगाळ वातावरण होते कालच्यापेक्षा थंडीत कमी असली तरी आज वाऱ्याचा जोर वाढला आहे या वाढलेल्या वाऱ्यामुळे मराठवाड्यासह लगतच्या भागात हलका ते अलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे .
चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर याठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

द्राक्ष बागायतदार तसेच फळबागायात दारांना याचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान झाले.
छत्तीसगडपासून मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. तर कोकण आणि गोवा परिसरावर चक्राकार वारे वाहत होते. परिणामी, राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होते. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला.
राज्याचे तापमान हे सातत्याने कमी अधिक होत आहे. शुक्रवारी (ता. ७) निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये ७.८ अंशापर्यंत खाली आलेले तापमान शनिवारी (ता. ८) पुन्हा १० अंशांवर पोचले. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले.