बीड : ‘कोरोना’ ( Coronavirus ) आपत्तीचे उच्चाटन करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला अनेकांकडून मदत होत आहे. पण अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याने तब्बल १० हजार रुपये मुख्यमंत्री निधीस दिले आहेत.
रेल्वेत मजुरी करणाऱ्या कुटुंबातील हा चिमुकला आहे. बक्षिसापोटी त्याला हे १० रुपये मिळाले होते. पण त्याने ही रक्कम ‘कोरोना’ ( Coronavirus ) आपत्ती निवारणासाठी दिले.
संविधान दीपक गडसिंग असे या चिमुकल्याचे नाव आहे. तो तिसरीमध्ये शिकतो. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्याने आज या रकमेचा धनादेश दिला. ‘तुझ्या संविधान या नावातच सर्व काही आहे,’ अशा शब्दांत मुंडे यांनी या चिमुकल्याचे व त्याच्या कुटुंबियांचे कौतुक केले.
काही दिवसांपूर्वी चाटगाव येथील तलावात एका शाळकरी मुलीला पाण्यात बुडण्यापासून संविधानने मोठ्या हिमतीने वाचवले होते. त्यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून संविधानचे कौतुक झाले होते. अनेकांनी त्याचा सत्कार केला होता. त्याच्या या बहादुरीबद्दल अनेकांनी त्याला रोख बक्षीसही दिले होते. बक्षिसातून गोळा झालेली दहा हजार रुपये रक्कम संविधानने आज कोरोनाच्या ( Coronavirus ) संकटाशी सामना करत असलेल्या राज्य सरकारला देऊन त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी त्याने केली.

संविधानचे वडील दीपक गडसिंग हे बीड परळी रेल्वेमार्गावर मजुरी करतात. घरची परिस्थिती तशी नाजूकच. तरीही त्याने व त्याच्या कुटुंबाने दाखवलेले हे औदार्य वाखाणण्या जोगे व समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करणारे आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे. यावेळी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमरसिंह पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-