ग्लोबल न्यूज:राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले.

याआधी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ते दोघेही बरे झाले आहेत. तसंच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यातील अनेकजण कोरोनावर मात करुन घरी परतलेत. आता मंत्री मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मुंडे यांनी 8 जून रोजी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण देखील केले होते.

धनंजय मुंडे बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं संपर्कात आलेल्या मंत्र्यांसह अन्य लोकांनाही 28 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचं आवाहन जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलं आहे. ठाकरे सरकारमध्ये आतापर्यंत तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.