मंत्री आदित्य ठाकरेंनी वाढदिवसाच्या दिवशी ठेवला नवा आदर्श
ग्लोबल न्यूज: मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे आणि होर्डिंग लावण्यावर खर्च करण्याऐवजी संकटात असलेल्यांना मदत करा, असं आवाहन करणारे शिवसेनेचे युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर कृतीद्वारे आदर्श ठेवला आहे. एका नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी १ लाख रुपयांची तातडीची मदत दिली आहे.

आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र, राज्यात करोनाचे संकट असताना वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी तसं जाहीर केलं होतं. तसंच, शुभेच्छा देण्यासाठी कुणीही ‘मातोश्री’वर गर्दी करू नये. त्याऐवजी केक, पुष्पगुच्छ व होर्डिंगचा खर्च करोनाशी झुंजणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी करावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र, ते केवळ बोलून थांबले नाहीत. सहा दिवसांच्या बाळाच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी त्यांनी नवी मुंबईतील अब्दुल अन्सारी यांना एक लाख रुपयांची मदत केली आहे.

घणसोली इथं राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज व एक छिद्र असल्याचं निदान झालं होतं. ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाच्या जीवाला धोका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर अन्सारी यांना नेरूळच्या मंगल प्रभू रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र, बाळाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं अन्सारी त्याला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात घेऊन आले. तिथं आल्यावर त्यांच्यासमोर शस्त्रक्रियेच्या खर्चाचा प्रश्न उभा ठाकला. पैसे जमवण्यासाठी ते प्रयत्नशील होते.

सोशल मीडियातून आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ही बाब आली. त्यांनी लगेचच युवा सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत याबाबत माहिती घेतली आणि अन्सारी यांना एक लाख रुपयांची मदत केली. अधिक मदत लागल्यास ती देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. सध्या या बाळावर उपचार सुरू असून अब्दुल अन्सारी यांनी आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.