कथा भगवंत अवताराची : अंबऋषी कारणे जन्म सोशीयेले । दुष्ट निर्दाळीले किती एक ।।
बार्शी :
अंबऋषी कारणे जन्म सोशीयेले ।
दुष्ट निर्दाळीले किती एक ।।
संत तुकाराम महाराजांनी असे ज्यांचे वर्णन केले आहे. त्या अंबरीष वरद भगवंताचा वैशाख वदय द्वादशी हा प्रगट दिन. प्रतिवर्षी हा प्रगटदिन हभप जयवंत बोधले महाराज यांच्या पहाटेच्या किर्तनाने संपन्न होतो. पण यंदा प्रथमच कोरोनामुळे कीर्तन नाही, भक्तांची गर्दी नाही .अत्यन्त साधेपणाने चार पुजाऱ्यांच्या उपस्थितीत सूर्योदयाला गुलाल उधळून बार्शीकर मोठया उत्साहाने हा प्रगट दिन साजरा केला.

भगवंताचे मंदिर असलेले जगातील एकमेव स्थान म्हणजे बार्शी. बारस म्हणजे द्वादशी व द्वादश नगरी म्हणजेच बारस नगरी. यावरून बार्शी हे नांव प्रचलित झाले आहे. “पुंडलिकाभेटी परब्रह्म आलेगा’ असे विठ्ठला बद्दल म्हणजे जाते. तसेच “अंबऋषी कारणे जन्म सोशीयेले’ असे भगवंताबद्दल म्हटले जाते.
त्यामुळेच पंढरपूरचे वारकरी सांप्रदायामध्ये जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व बार्शीला आहे. मराठवाडा, विदर्भ या भागातील वारकरी व दिंड्या आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात व द्वादशीला भगवंताच्या दर्शनाला बार्शीला येतात. पांडुरंगाच्या दर्शनानंतर भगवंताचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांना वारी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही.

अंबरीष राजाच्या वास्तव्याने बार्शी शहराला एक वेगळे पावित्र्य प्राप्त झाले आहे. भगवंताचे सुदर्शनचक्र येथे स्थिरावले आहे व १२ पवित्र तीर्थे (ज्योर्तिलिंग) निर्माण झालेली आहेत. सत्य युगामध्ये मनुपूत्र नभग राजा होवून गेला. त्याने अनेक वर्षे या पृथ्वीवर राज्य केले. त्यास नाभाग व इतर पुत्र झाले. यापैकी नाभागाने भगवान शंकराला नम्रतापूर्वक अभिवादन करून प्रसन्न करून घेतले व त्यांनी नाभागाला आशिर्वाद दिला की, तुला दिव्यभक्तीचे ज्ञान प्राप्त होईल व तुझ्या कुळामध्ये महान भक्त जन्म घेईल. या नाभागाचा मुलगा म्हणजेच महानभक्त अंबरीष राजा होय.

अंबरीष राजा नवविधा भक्ती करत असे. त्यांच्या या महानभक्तीमुळे ते या जगात प्रसिध्द झाले. नारदाच्या उपदेशाने राजा अंबरीषाने एकादशी व्रत धारण केले. हे व्रत म्हणजे दशमी, एकादशी व द्वादशी असे तीन दिवसाचे व्रत होय. दशमीला एकभुक्त म्हणजे एकदाच भोजन घ्यावे. एकादशीला लंघन करावे. लंघनामुळे शरीर व मन शुध्द होतात. द्वादशी दिवशी परान्न म्हणजे दुसऱ्याचे अन्न घेवू नये. घरीच द्वादशी सोडावी. अशा प्रकारे अंबरीष वर्षभर दशमी, एकादशी व द्वादशी व्रत करून पारणे करावयाचे ठरवतो.

नेमके त्यावेळेसच इंद्राच्या सांगण्यावरून अंबरीष राजाचा व्रतभंग करण्यासाठी अत्यंत क्रोधी व शक्तीमान दुर्वासमुनी अगंतुकपणे तेथे येतात. अंबरीष राजा मनोभावे व आनंदाने दुर्वासाचे स्वागत करतात. त्यांना भोजनासाठी विनंती करतात. दुर्वासऋषी भोजनाला होकार देतात.
परंतु मी स्नान करून भोजन घेण्यास येतो असे सांगून स्नानास नदीवर जातात. इकडे व्रताचे पारणे फेडण्याचा मुहूर्त जवळ येतो. पण दुर्वास कांही लवकर येत नाहीत. तेंव्हा मुहूर्तावर पारणे तर फेडले पाहिजे व अतिथी धर्माचेही पालन झाले पाहिजे. या विचारात अंबरीष राजा असताना त्यांना पाण्याचा थेंब तुळशीपत्राने जीभेवर सोडावा यामुळे पारणे फेडल्यासारखेही होईल व अतिथी धर्माचे पालनही होईल असे सांगितले गेले.

राजा त्याप्रमाणे करतो. दुपारपर्यंत दुर्वास येतात. तेंव्हा त्यांचा क्रोध अनावर होतो व क्रोधाने ते अंबरीष राजाची निर्भत्सना करतात व आपल्या केसापासून अत्यंत अनाकर्षक कृत्या निर्माण करून ती क्रोधाने हाती त्रिशूल व तलवार घेवून अंबरीष राजाच्या अंगावर सोडतात. तेंव्हा भगवंताच्या सुदर्शन चक्रापुढे ती भस्मसात होते व ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे धावू लागते.
शेवटी श्री विष्णूंच्या सांगण्यावरून दुर्वासऋषी अंबरीष राजाला शरण येतात व सुदर्शन चक्रापासून सुटका करण्याची विनंती करतात. तेंव्हा अंबरीष राजाने सुदर्शन चक्र शांत केले. भगवंताने आपल्या परमभक्तास दर्शन देवून वर मागण्यास सांगितले. तेंव्हा अंबरीषाने भगवंतास, तुझ्या चरणी मला सतत जागा असावी ही मागणी केली. ही मागणी भगवंतांनी मान्य केली. भगवंताच्या पायाशी आजही आणास अंबरीष हात जोडून उभा असलेला दिसून येतो.

भगवंताच्या पाठीमागे लक्ष्मी उभी आहे. भगवंताच्या छातीवर भृगूऋषींच्या पावलाची खूण आहे. तर मुकूटावर हरिहराचे ऐक्य दाखविणारे शिवलिंग आहे. असा हा अंबरीष वरदा श्री भगवंत अनादिकालापासून भक्ताच्या रक्षणासाठी बार्शीत उभा आहे. या भगवंताचे मुख्य मंदिर हेमाडपंथी आहे. भगवंतासमोर वीरासनात गरूडाची संगमरवरी सुंदर मूर्ती आहे. याच मंदिरात जोगापरमानंदाची समाधी आहे. या जोगापरमानंदालाही भगवंताने दर्शन दिले अशी आख्यायिका आहे.
यावर्षी भगवंताचा महोत्सव सात दिवस मोठया प्रमाणात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. हा महोत्सव म्हणजे बार्शीच्या ग्रामदैवताची यात्रा व्हावी असा विचार समाजधुरीण आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मनात आला व त्यांच्याच प्रेरणेने हा भव्य दिव्य महोत्सव सोहळा संपन्न होत आहे. या महोत्सवातून सर्वांना अंबरीष राजा प्रमाणे भक्तीची आवड निर्माण व्हावी व सर्व बार्शीकर गुण्यागोविंदाने नांदावेत ही भगवंत चरणी प्रार्थना

प्रा.विलास जगदाळे, बार्शी