बार्शी: बार्शी तालुका कृषी पदवीधर विश्वस्त मंडळाकडून येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जगदाळे मामा हॉस्पिटल च्या प्रस्तावीत ट्राॅमा युनिट करिता तीन लाख तेहतीस हजार रुपये देणगी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली.
तालुक्यातील सर्व कृषी पदवीधरांनी सन 1995 मध्ये आपल्या कर्मभूमी साठी , जन्मभूमी साठी “बार्शी तालुका कृषी पदवीधर विश्वस्त मंडळ “ स्थापन केले आहे . सदर चे मंडळ तालुक्यामध्ये विविध सामाजिक व ग्रामविकासाचे उपक्रम राबवत आहे .
पाणीफाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये या कृषी पदवीधरांच्या गावांनी उत्तम कामगिरी केली आहे . याच अनुषंगाने बार्शी तालुक्यातील एकूण दहा गावांमध्ये सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक म्हणून सदरचे विश्वस्त मंडळ काम करीत आहे .
या विश्वस्त मंडळातील बहुतांश कृषी पदवीधर हे बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत . त्यांच्या जीवनातील शैक्षणिक घडामोडीमध्ये शिवाजी महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे . त्यामुळे या मोठ्या प्रोजेक्ट ला आपलाही हातभार लावावा अशी मंडळाचे मार्गदर्शक आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पर्सनल सेक्रेटरी संतोष पाटील यांनी मांडला व त्याला साथ देत मंडळाने हा निर्णय घेतला.

त्यामुळे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामार्फत चालवण्यात येत असलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ट्राॅमा युनिट स्थापन करण्यासाठी सध्या निधी संकलीत करीत असल्याची माहिती कृषी पदवीधरांना समजली . सामाजीक बांधीलकीची जाण ठेवून सर्व कृषी पदवीधरांनी “बार्शी तालुका कृषी पदवीधर विश्वस्त मंडळाच्या “ मार्फत निधी संकलन सुरू केले . प्रत्येकाने स्वईच्छेने दिलेल्या देणग्यामधून एकूण रुपये तीन लाख तेहतीस हजार एवढा निधी जमा करण्यात आला .

जगदाळे मामा हॉस्पिटलचा बार्शी तालुका आणी सोलापूर , उस्मानाबाद या जिल्ह्यातील रुग्ण सेवेमध्ये अत्यंत महत्वाचा वाटा आहे . ना नफा ना तोटा तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या या हॉस्पिटलला ट्राॅमा युनिटची आवश्यकता वाटली . ट्राॅमा युनिट हे तालुक्यातील , जिल्ह्यातील , आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील अपघातग्रस्तांच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाची भुमीका निभावणार आहे.
यामध्ये वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक सुविधा , एम.आर.आय. , सी.टी. स्कॅन , ॲापरेशन थिएटर उपलब्ध असेल . याशिवाय परदेशातील अपघातग्रस्तांच्या वैद्यकीय सेवांच्या धर्तीवर या हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असतील . त्यांना अपघातग्स्तांची व ठिकाणाची माहिती जी.पी.एस. द्वारे पुरवण्यात येईल. त्यामुळे अतिशय कमी प्रतिसाद कालावधीमध्ये ( रिस्पाॅन्स टाईम ) सदरच्या ऍम्ब्युलन्स अपघाताच्या ठिकाणी पोहोचुन अपघातग्रस्तांना तातडीचे प्रथमोपचार देतील .
त्यानंतर अपघातग्रस्तांना लवकरात लवकर ट्राॅमा युनिटमध्ये पोहोचवुन आधुनिक वैद्यकीय उपचार केले जातील . अपघातग्रस्तांसाठी अत्यंत महत्वाचा “गोल्डन अवर “ या कार्यक्षम व आधुनिक पद्धतीने उपयोगात आणला जाईल . त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अपघातग्रस्तांचे मोठा प्रमाणात प्राण वाचवण्यासाठी याची मदत होईल . यामुळे बार्शी तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील अपघातग्रस्तांची प्राणहाणी ५० % पर्यंत कमी होईल.
रस्ते अपघातामधील वा इतर कोणत्याही अपघातातील अपघातग्रस्तांचे जीवनरक्षणासाठी अत्यंत महत्वकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी बार्शी तालुका कृषी पदवीधर विश्वस्त मंडळाने स्वयंस्फूर्तीने जमा केलेला निधी रुपये तीन लाख तेहतीस हजार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी. वाय. यादव यांच्याकडे आज दि. २२ रोजी संस्था कार्यालयात जावून सुपूर्द करण्यात आला .
बार्शी तालुका कृषी विश्वस्त मंडळाने नेहमीच समाजिक बांधिलकी जपून समाजाच्या व तालुक्याच्या ऋणातुन उतराई होण्याचा प्रयत्न केलेला आहे . तालुक्याच्या आणि या समाजाच्या ऋणामध्ये राहत असताना त्यांच्या उन्नतीसाठी विकासासाठी “ बार्शी तालुका कृषी पदवीधर विश्वस्त मंडळ” नेहमीच प्रयत्नशील राहील .
सदरचा धनादेश अध्यक्ष सयाजीराव गायकवाड , सचिव भारत कदम , संस्थापक सदस्य तथा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते डाॅ. बी. वाय. यादव यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला . या प्रसंगी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधीकारी व्ही एस पाटील,जयकुमार शितोळे, दिलीप रेवडकर , शाखा प्रमुख व बार्शी तालुका कृषी पदवीधर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थीत होते .