पुणे : ज्येष्ठ पत्रकार आणि “सकाळ’चे माजी संपादक अनंत भगवान दीक्षित (वय 67) यांचे आज संध्याकाळी निधन झाले. अंत्यसंस्कार बुधवारी ( 11 मार्च) सकाळी नऊ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशामभूमीत होतील. प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्री. दीक्षित यांना दुपारी पुण्यातील रत्ना रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांची कन्या स्कॉटलंडमध्ये असते. ती मंगळवारी संध्याकाळपर्यंत पुण्यात परतेल. त्यानंतर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. सकाळ माध्यम समूहात दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या अनंत दीक्षित यांनी कोल्हापूर आणि पुणे ‘सकाळ’चे संपादक पद भूषविले होते. श्री. दीक्षित यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला होता. त्यांचे शिक्षण बार्शीतच झाले. पुण्यात त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापूर आणि पुन्हा पुणे असा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास राहिला. मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या जाणकार संपादकांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जायचं. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती.
तटस्थ राजकीय विश्लेषक म्हणूनही, त्यांची ओळख होती. तसेच साहित्य विषयक त्यांचा व्यासंग होता.

पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान होते. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण विश्लेषण तसेच, शैलीदार वक्तृत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष गुण होते. निवृत्तीनंतर गेल्या काही वर्षांत त्यांनी न्यूज चॅनेलवर राजकीय विश्लेषक म्हणूनही आपली स्वतंत्र छाप पाडली होती. कोल्हापूर शहराशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. कोल्हापूरशी आणि तिथल्या माणसांशी असणारी त्यांची नाळ शेवटपर्यंत कायम होती. त्यांच्या मागे पत्नी अंजली, कन्या अमृता, नात चार्वी आणि जावई, असा परिवार आहे.