बार्शीत सलग दोन दिवस अवकाळी पाऊस, रब्बी हंगामातील पिकांसह, फळबागांना फटका, शेतकरी धास्तावला

    0
    373

    बार्शीत सलग दोन दिवस अवकाळी पाऊस, रब्बी हंगामातील पिकांसह, फळबागांना फटका, शेतकरी धास्तावला

    बार्शी :

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    निसर्ग काही केल्या शेतकऱ्यांचा पिच्छा सोडावयास तयार नसून गेल्या काही वर्षापासून ऐन सुगीच्या दिवसांत अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तसाच यावर्षीही रब्बी हंगामाच्या सुगीच्या काळात अवकाळी पाऊस व गारपिटीने बार्शी तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष, लिंबू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर रविवारी सायंकाळीही या अवकाळी पावसाने तालुकयात हजेरी लावली आहे.

    शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास वादळी वारा, वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. सुमारे अर्धा तासभर झालेल्या या पावसाने तालुक्यातील द्राक्षबागांना  फटका बसला. खामगांवमध्ये नागनाथ नामदेव लोखंडे यांनी मोठया कष्टाने जोपासलेली व काढणीस तयार असलेली द्राक्षबाग भुईसपाट झाली. अवकाळीच्या तडाख्यात परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांमध्येही द्राक्षमणी तुटून पडले. त्यामुळे घडांना नुकसान पोहोचले. विनोद ठोंबरे यांचेसह इतरही कांही शेतकऱ्यांचे बेदाणे शेडचे मोठे नुकसान झाले. कांदलगांव येथेही द्राक्षबागांना फटका बसला.


    तालुक्यातील कारी, नारी, इंदापूर, कापसी, सावरगांव, लाडोळे, कांदलगांव यासह पांगरी, वैराग भागातील द्राक्षबागांचे क्षेत्र मोठे असून द्राक्ष उत्पादक शेतकरी अवकाळी पावसाने धास्तावले आहेत. द्राक्ष ऐन काढणीस आलेले असतानाच अवकाळी पावसाने दर पडल्याने शेतकऱ्यांना अप्रत्यक्षही फटका बसला आहे.

    तसेच रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या व शेतात काढून पडलेल्या ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांनाही या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. खामगांवमध्ये मोठया प्रमाणावर उभी ज्वारी वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली. पावसाने ज्वारी, कडबा काळी पडण्याची शक्यता आहे. चिखर्डे, तांदुळवाडी या परिसरात लिंबू पिकाची मोठया प्रमाणात गळ होवून नुकसान झाले. मोहोर झडून आंब्याचे नुकसान झाले. खामगांवच्या कृषी सहायक शोभा घुटे यांनी खामगांव व तांदुळवाडी भागामध्ये नुकसान झाल्याचे कळताच रविवार सकाळी प्रत्यक्ष जावून नुकसानीची पाहणी केली.


    चौकट

    कित्येक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेचे व्यापाऱ्यांसोबत विक्रीचे सौदे ठरविण्यास सुरू केले होते. अवकाळी पाऊस पडल्यानंतर व्यापारी स्वत: अगोदर बोललेल्या दरावर सुध्दा तो माल घेण्यास तयार नाहीत. अवकाळीमुळे धास्तावलेल्या द्राक्ष उत्पादकांनी मग नमते घेत नुकसान सहन करत कमी दरात द्राक्ष दिले. अवकाळी पावसाने व्यापाऱ्यांनी लगेच प्रतिकिलो मागे पाच ते दहा रूपये कमी केले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना याचा आर्थिक फटका बसला आहे. तर काढून पडलेला कडबा, ज्वारी या पावसामुळे काळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur