बार्शी ः शहरातील पोस्ट चौकात वाहतूक सेवा बजावत असताना तिघेजण एकेरी वाहतुकीचा नियम तोडून दुचाकीवरून आल्यानंतर पोलिसांनी पकडले असता पोलिसांस काठीने मारहाण करून युनिफॉर्म फाडून शिवीगाळ केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यास अटक करून न्यायालयात उभे केले असता 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी एस. एन. धडके यांनी दिले.
गणेश रमेश यादव (वय 35, रा. वाणेवाडी, ता. बार्शी) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. वाहतूक पोलिस तेजस जंगम यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली.
पोस्ट चौकात वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिस जंगम व गोसावी असे दोघेजण करीत होते. या वेळी एकेरी वाहतूक असणाऱ्या रस्त्यावरून नियम तोडून दुचाकीवर बसून तिघेजण वेगाने जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. तुम्हाला एकेरी वाहतूक दिसत नाही का? असे दुचाकीस्वारांना विचारले असताना उद्धटपणे पोलिसांनाच त्यांनी तुम्ही फक्त आम्हालाच अडवतात, असे म्हणून शिवीगाळ केली.

त्यातील एकाने वाहनावरून खाली उतरून रस्त्याच्या कडेला पडलेली बांबूची काठी घेतली. पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन जंगम यांच्या पायावर काठीने मारहाण केली. छातीवर ठोसा मारून गच्ची पकडून धरपकड करीत शासकीय युनिफॉर्म फाडला. या वेळी दोघांनी मिळून सौम्य बळाचा वापर करून त्यास पकडले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
इतर दोघेजण ही भांडणे सुरू असताना दुचाकी घेऊन पसार झाले. यादव यास रिक्षातून पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी त्याचा उग्र वास येत होता. त्याची वैद्यकीय तपासणी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अमोल ननावरे तपास करीत आहेत.