प्रतिनिधी बार्शी
गणेश भोळे
बार्शी शहरात कोरोना बाधित रूग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचा बाहेर संपर्क येणार नाही यादृष्टीकोनातून कडक अंमलबजावणी करा अशा सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्या.

बार्शी शहरात आढळलेल्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर बार्शी नगरपालिकेत प्रांताधिकारी निकम यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिध्देश्वर भोरे, तहसीलदार प्रदीप शेलार, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड, पालिकेचे वैदयकीय अधिकारी डॉ.विजय गोदेपुरे आदी उपस्थित होते.

प्रांताधिकारी निकम म्हणाले, कोविड १९ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू केलेल्या नियमावलीचा कडक अंमलबजावणी करावी. तेथे कर्मचारी तैनात करून चोख बंदोबस्त ठेवावा. प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची सोय करावी. तसेच त्यासाठी रजिस्टर बनवून सर्व हालचालींची नोंद ठेवावी. प्रतिबंधित क्षेत्रातील सार्वजनिक स्वच्छतागृहे दिवसातून तीन वेळा सॅनिटाईझ करावे अशा सूचना केल्या.

निकम पुढे म्हणाले, कोविड बाधित रूग्णांची वाढ होत आहे. मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर आदी दुर्धर आजार असलेल्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. संसर्ग होणार नाही तसेच मृत्यू टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर लक्ष केंद्रित करायला हवे. शहर व तालुक्यात दुर्धर आजार असलेल्या लोकांचा आशा सेविकांमार्फत सर्व्हे करण्यात आला आहे. सदरचे वृध्द नियमित औषध घेतात का ? याचीही माहिती घेतली जात आहे. तसेच ज्या गरजूंकडे औषधे नाहीत त्यांची औषधांची सोय करण्यात येईल असे सांगितले.
कंटेनमेंट झोनमधून लोक बांबूवरून उड्या मारून जात होते, तेथे एकही कर्मचारी नव्हता.. प्रांताधिकारी यांची खंत, मुख्याधिकारी यांना बजावले

प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या ठिकाणी आपण भेट दिली असता तेथे लोक बांबू वरून उडया मारून जात असल्याचे चित्र दिसले. नगरपालिका व पोलीस प्रशासनाचा एकही कर्मचारी तेथे दिसला नाही अशी खंत व्यक्त करत असे व्हायला नको असे त्यांनी मुख्याधिकारी यांना बजावले.