पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना केंद्र शासनाचे आंतरिक सुरक्षा सेवापदक जाहीर
बार्शी : बार्शीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात बजावलेल्या सेवेबद्दल केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा पोलीस आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर करण्यात आले आहे. सन २०१५ च्या पोलीस आंतरिक सुरक्षा सेवा पदकासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सदरचे पदक जाहीर करण्यात आले आहे.
संतोष गिरीगोसावी हे मागील २५ वर्षापासून पोलीस खात्यात नोकरी करत आहेत. यापूर्वी दोन वेळा राष्ट्रपती शौर्य पदकाने गोसावी यांना गौरविण्यात आले आहे. मुंबई क्राईम ब्रँच, गोरेगांव पोलीस ठाणे, नाशिक जिल्हा, जळगांव जिल्हा, पुणे ग्रामीण अंतर्गत चाकण, तळेगांव येथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एनकाऊंटर केसमध्येही गोसावी यांची सहभाग होता.


चाकण येथे दंगल झाली त्यावेळी त्यांची पुन्हा खास तेथे नियुक्ती करण्यात आली होती. स्थानिकांना मदतीला घेत दंगल शमविण्याची महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली होती. पोलीस खात्यातील उत्कृष्ट सेवेबद्दलही गिरीगोसावी यांना खात्यांतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या हस्ते वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. पोलीस आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर झाल्याने गिरीगोसावी यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
