पुण्यात धोका वाढला : कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये आता योजणार हा शेवटचा उपाय
पुणे : मुंबईपाठोपाठ पुणे जिल्हाही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. निर्बंधांची कडक अंमलबजावणी करूनही पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या 606 वरुन थेट 1319 वर पोहोचली आहे. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून अतिसंक्रमित भागातून नागरिकांना हलवण्याचा उपाय पुणे महापालिका योजत आहे. अतिसंक्रमित क्षेत्रातील लोकांना तात्पुरतं स्थलांतरित करण्याची महापालिकेची योजना असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

लॉकडाऊनच्या काळात निर्बंध अधिक कठोर केल्यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पाहाणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकानेही चिंता व्यक्त केली होती. 7 दिवसांत रुग्णसंख्येत दुप्पट वाढ होत असून 9 पैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याचं निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे.
पुण्यात सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ, कसबा पेठ, ढोले पाटील रस्ता या वॉर्डात झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली दाटीवाटीची वस्ती, छोटी घरं यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून कासेवाडी आणि इतर काही झोपडपट्टा भागात कोरोनाचे अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशा हॉटस्पॉट्समधून नागरिकांचं स्थलांतर करण्याचा उपाय पालिका करणार आहे.तात्पुरत्या क्वारंटाइन सेंटरमध्ये त्यांची सोय करण्याची महापालिकेची तयारी आहे.

पालिकेने घेतला आढावा
महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सुनील फुलारी, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, पंकज देशमुख आदींनी या पाचही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील भागांना भेट दिली आणि आढावा घेतला.

महापालिकेचे अनेक अधिकारीही या वेळी उपस्थित होते. दाट लोकवस्तीमध्ये अनेकांची घरे सुमारे शंभर चौरस फुटांची आहेत. त्या कुटुंबात 4 ते 5 जण असतात. त्यामुळे सोशल डिन्स्टिसिंगच्या नियमांचे पालन होत नाही. परिणामी कोरोनाच्या संसर्गाचा धोका कायम आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना मोठ्या जागांमध्ये राहण्याची तात्पुरता व्यवस्था करण्यात येणार आहे.

त्यासाठी महापालिकेच्या शाळा, खासगी मंगल कार्यालये आणि वसतीगृहे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांतून तेथे जेवण, न्याहारी पुरविणे शक्य आहे. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. काही रहिवाशांना एसआरएच्या इमारतींमध्येही हलविता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात 20 हजार जणांचे स्थलांतर
महापालिकेने 71 हजार कुटुंबे स्थलांतर करण्याची तयारी सुरू केली असली तरी पहिल्या टप्प्यात सुमारे 20 हजार कुटुंबे स्थलांतरीत होतील, असा महापालिकेचा अंदाज आहे. तेथे स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. महापालिका सुरवातीला या कुटुंबांना आवाहन करणार आहे. एक आड एक, घरातील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात येईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

क्षेत्रीय कार्यालये – भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता, कसबा पेठ, घोले रोड आणि येरवडा
हॉट स्पॉटमधून स्थलांतर कराव्या लागणाऱ्या कुटुंबांची संख्या – सुमारे 71 हजार
स्थलांतर करावी लागणारी लोकसंख्या : सुमारे 3 लाख 50 हजार
शहरातील एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण या भागातील
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्येही या भागातील रहिवाशांचे प्रमाण 70 टक्क्यांहून जास्त