पुणे: शहरात कोरोनाबाधित नवीन रुग्णांची दिवसभरातील संख्या आज ( मंगळवारी) दीडशेच्या पुढे गेली असून 164 रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. 7 जणांचा मृत्यू झाला. तर कोरोनमुक्त झालेल्या 120 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून असलेल्या क्रिटिकल रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. सध्या 107 रुग्ण क्रिटिकल आहेत. त्यातील 25 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 2,737 आणि अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1,372 इतकी आहे. शहरात कोरोनामुळे एकूण मृत्यू 156 झाले आहेत. तर दिवसभरात 989 स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
ससूनमध्ये 3 नागरिकांचा बळी गेला आहे. हे सर्व नागरिक 60 ते 75 या वयोगटातील आहेत. 2 पुरुष आणि 1 महिलेचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. येरवड्यातील 72 वर्षीय आणि 64 वर्षीय पुरुषाचा तर, बिबवेवाडीतील 75 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

मृत्यू झालेल्या या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त हृदयरोग, हायपरटेन्शन, डायबेटीस, उच्चरक्तदाब, किडनी विकार व इतरही आजार होते. ससूनमध्ये आतापर्यंत 93 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 95 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर, नाना पेठेतील 57 वर्षीय महिलेचा आणि 59 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. ताडीवाला रोड भागातील 75 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, हडपसर – माळवाडी भागातील 86 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.
आज 5 पुरुष आणि 2 महिलांचा मृत्यू झाला. सर्वांचे वय 60 – 70 – 80 वयोगटातील आहे. कोरोनाची भीती जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक आहे. त्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.