महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय चांगला आणि राज्याच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प दिला आहे. अर्थसंकल्पातून राज्यातील सर्व थरांतील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुरुवात चांगली झाली आहे. पुढील पाच वर्षांत महाविकास आघाडी सरकार असेच निर्णय घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संस्थगित झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकारने या अधिवेशनात अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. अशाच प्रकारे चांगले निर्णय घेऊन राज्याला प्रगतीच्या मार्गाने नेऊ.
औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याच्या निर्णयाप्रमाणेच ज्यांनी हे राज्य घडवले त्यांची माहिती आमदारांना व्हावी यासाठी प्रत्येक अधिवेशनात अशा नेत्यांसंबधीचे एक व्याख्यान विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात घेण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले त्यांच्यासाठी प्रोत्साहन योजना त्याचप्रमाणे दोन लाखांवरील पीक कर्ज असलेल्या शेतकNयांसाठीची कर्जमुक्ती योजना असे अनेक जनतेच्या हिताचे निर्णय या सरकारने पहिल्याच अधिवेशनात घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, संसदीय कामकाजमंत्री अनिल परब उपस्थित होते.
निवडणूक पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयुक्तांशी चर्चा
नवी मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या वातावरणात निवडणुका कोणालाच परवडणार नाहीत. प्रचार करणेही शक्य नाही. त्यामुळे निवडणूक आयुक्तांशी या विषयावर चर्चा करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


कोरोना रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. आवश्यक त्या सर्व दक्षता घेण्यात येत आहेत. गर्दी टाळून व दिलेल्या निर्देशांचे पालन करून जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन करताना हे संकट आपण दूर करूच, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव होत असला तरी जे रुग्ण आहेत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे. जर अशीच सुधारणा होत राहिली तर लवकरच त्यांना घरीदेखील पाठवता येऊ शकते, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या रो रो सेवेला शुभेच्छा
भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा उद्यापासून सुरू होत आहे. या सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. राज्यातील कोरोनासंदर्भातील परिस्थिती लक्षात घेता शासकीय कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नसला तरी जनतेच्या सोयीसाठी उद्यापासूनच ही सेवा सुरू करण्यात येत आहे. या सेवेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
