नुकसानग्रस्त भागातील लोकांना अत्यंत वाईट अवस्थेत ठेवलंय : देवेंद्र फडणवीस
रायगड : मागच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान झालं आहे. जिथे नुकसानग्रस्तांना ठेवलं आहे त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे. अनेकांचे हाल होत आहेत. सर्वात आधी त्या लोकांची राहण्याची सोय योग्य पद्धतीने केली पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. श्रीवर्धन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. नुकसानग्रस्तांना जिथं जिथं ठेवलं आहे त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे. अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवण्यात आलं आहे. त्यांना आधी योग्य ठिकाणी ठेवलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

सरकारने हेक्टरी 50 हजाराची मदत घोषित केली आहे. मात्र हे नुकसान वेगळं आहे. पिकांच्या बाबतीत ही मदत ठिक आहे, पण कोकणात पुढील अनेक वर्षे उत्पन्न देणारी झाडं पडली आहेत. जी उभी आहेत त्या झाडांची अवस्था देखील वाईट आहे, असं फडणवीसांनी सांगितलंय.
आम्ही आमच्यावेळी केंद्र आणि एनडीआरएफची एकत्रित रक्कम देऊन अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत देऊ केली होती. आत्ता लोकांना घरावर छतं लावायची आहेत त्याचा काळाबाजार सुरु झाला आहे. सरकारने काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. सरकारने या गोष्टी कमी किमतीत उपलब्ध करुन द्याव्यात, असं फडणवीस यांनी म्हणाले आहेत.