चक्रीवादळाबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : चक्रीवादळानं विध्वंस करायला सुरूवात केली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये वादळाचा वेग वाढला असून, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. त्याचबरोबर घराचंही नुकसान झालं आहे. वादळाची दिशा ५० किलोमीटरने दक्षिणेला सरकली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे अशी माहिती एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक एस एन प्रधान यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील १३५४१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी माहिती दिली आहे.
चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीला स्पर्श केला असून, समुद्रही खवळला आहे. लाटा किनाऱ्यावर येऊन धडकू लागल्या आहेत.
मराठी कलाकारांनी मुंबईकरांना केलं घरी राहण्याचं आवाहन
नाशिक: IMD व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई ३२ यांनी दिनांक ३१/०५/२०२० रोजी व त्यानंतर वेळोवेळी देण्यात आलेल्या संदेश लक्षात घेता दिनांक १ जून ते ४ जून पर्यंत चक्रीवादळाच्या दृष्टीने करावयाच्या तातडीच्या उपाययोजनाकडे आपले लक्ष देणेकामी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास व सर्व कार्यकारी यंत्रणा सतर्क केले आहे. या कालावधीत होणारा पाऊस , अतिवृष्टी , तीव्र अतिवृष्टी, वाऱ्याचा वेग, वीज कोसळणे, झाडे कोसळणे, वाहतूक व्यवस्था ठप्प होणे या स्थितीमुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सावधतेचा इशारा याबाबतची तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.

कोव्हीड १९ लक्षात घेता सुरक्षित निवाऱ्याची उपलब्धता , त्याचे निर्जंतुकीकरण, गरजेप्रमाणे कोव्हीड व नॉन कोव्हीड गंभीर रुग्णांचे स्थलांतरण, रुग्णालयाचा विद्युत पुरवठा, मनुष्यबळ व औषध पुरवठा, स्थानिक कार्यकारी यंत्रणा यांची दले व पथके तैनात करतांना मास्क व पीपीई किट्स ची उपलब्धता, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे नियोजन व मदत कार्य त्याचप्रमाणे संबधित सर्व विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याबाबत तातडीने निर्देश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे. तसेच नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करा : पालकमंत्री भुजबळ
हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ दि.३ किंवा ४ जून रोजी नाशिक जिल्ह्यात येण्याची शक्यता असून जिल्ह्यातील काही भागात नागरिकांना अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षा म्हणून दोन दिवस घराबाहेर पडणे टाळावे. घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन लांब रहावे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन सुरक्षित स्थळी हलवावे किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे.

मुंबईत ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वाहणार वारे
निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये प्रतितास १०० ते १२० किलोमीटर वेगाने सोसाटयाचे वारे वाहील. भारतीय हवामान विभागाचे डीजीएम मृत्यूंजय मोहापात्रा यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हे वादळ तीन जून रोजी संध्याकाळी मुंबई महाराष्ट्रसह गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे.
नाशिक जिल्ह्यात ताशी ५५-६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता
चक्रीवादळ धडकल्यानंतर सहा तास त्याची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावा मुळे पुणे, अहमदनगर जिल्ह्यात ताशी ६०-७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग ८० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. बीड, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात ताशी ५५-६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.