ना पॅकेज, ना धोरण; लॉकडाउनच्या पद्धतीवर सोनिया गांधीची मोदी सरकारवर टीका
नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोना आणि लॉकडाउनसंदर्भात पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. १७ मेनंतर काय होणार?…
लॉकडाउन कधीपर्यंत सुरू राहणार?… लॉकडाउनबाबत मोदी सरकारकडे पुढील रणनीती काय आहे?… असे एक ना अनेक प्रश्न सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत. सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत यांनी सरकारवर निशाणा साधला.


या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अध्यक्ष राहुल गांधींसह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
केंद्राकडे आर्थिक पॅकेजची मागणी
या बैठकीत राजस्थान, पंजाब, छत्तीसगड आणि पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केल्याची माहिती दिली. जो पर्यंत व्यापक असे प्रोत्साहन पॅकेज मिळत नाही, तोपर्यंत राज्य आणि देश कसा चालणार, असा प्रश्न राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उपस्थित केला. आम्ही १० हजार कोटी रुपयांचा महसून गमावल्याचेही ते म्हणाले. राज्यांनी अनेकदा पंतप्रधानांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे, मात्र पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले.

डॉ. मनमोहन सिंग यांचीही टीका
सोनिया गांधी विचारत आहेत, त्या प्रमाणे लॉकडाउन ३.० नंतर पुढे काय, सरकारची पुढील रणनीती काय आहे, असे आपणही विचारत असल्याचे सिंग म्हणाले. लॉकडाउच्या तिसऱ्या टप्प्यानंतर रणनीती काय असेल याची मुख्यमंत्र्यांना माहिती असणे आवश्यक आहे असेही ते पुढे म्हणाले.
पंजाबचेही प्रश्न
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केंद्र सरकारच्या लॉकडाउनबाबतच्या दृष्टीकोनावर टीकेची झोड उठवली. आम्ही दोन समिती तयार केल्या आहेत. एक समिती लॉकडाउनचे एग्झिट प्लान तयार करेल, तर दुसरी समिती आर्थिक पुनरुत्थानाबाबत रणनीती आखेल. मात्र, दिल्लीतील लोक कोणताही अभ्यास न करता झोनबाबतचा निर्णय घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
पुद्दुचेरीचाही आक्षेप
पंजाबप्रमाणे पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांनीही केंद्रावर टीका केलीय. राज्य सरकारांचा सल्ला न घेताच भारत सरकार झोनचे वर्गीकरण करत आहे, असे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी म्हणाले. दिल्लीत बसलेले लोक राज्यात काय सुरू आहे हे सांगू शकत नाहीत. झोन ठरवताना कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जात नाही, अशी तक्रार नारायणसामी यांनी केलीय.