नाणार प्रकल्पाबाबत भाजपने केले मुख्यमंत्र्यांना हे अहवान वाचा…….!
सूरज गायकवाड
ग्लोबल न्युज: नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या वाद-विवादावरून पुन्हा एकदा भाजपाने शिवसेनेला चिमटा काढला आहे. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबद्दल प्रत्येक कोकणवासीयांने विचार करण्याची गरज आहे.

अर्थकारण, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, विविधता व मागणी अशा पाचही कसोट्यांवर नाणार प्रकल्प कोकणला जागतिक पातळीवर यशस्वी करण्याची क्षमता बाळगतो. पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला वीस लाख कोटींचे पॅकेज दिले आहे, तर दोन-तीन वर्षापूर्वी नाणार प्रकल्पातून फक्त राजापूरात चार लाख कोटी आपण आणले होते.

याचाच अर्थ असा आहे, की फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी देशाच्या एकूण जीडीपीच्या दोन टक्के रक्कम या प्रकल्पातून मिळत होती. परंतु, क्षुद्र राजकारणापायी ‘देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ अशी कोकणची अवस्था करणाऱ्यांनी कोकणला आज किती मागे नेऊन ठेवले याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे भाजपनेते प्रमोद जठार म्हणाले.

जठार यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उत्तर प्रदेशसारख्या राज्याने पुढील दोन वर्षात राज्यात वीस लाख रोजगार निर्माण करण्यासंदर्भातल्या योजनेवर युद्धपातळीवर काम सुरु केले आहे. मात्र प्रगतीचा वारसा असलेल्या महाराष्ट्र सरकारने अशी कुठलीच तयारी केलेली दिसत नाही.
अशा वेळी कोकणात होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पामुळे कोकणातल्या एक ते दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे, याचा विचार करून आता तरी सन्मानाने या प्रकल्पाला सरकारने घरात घ्यावे. नाणार प्रकल्पाबद्दल खोडसाळपणे पसरवले गेलेले गैरसमज दूर झाल्याने स्थानिक जनतेनेही आपली जमीन देऊ करून प्रकल्पाचे केलेले स्वागत हि नक्कीच आशादायक स्थिती आहे. त्यामुळे आतातरी प्रकल्प स्वीकारून कोकणातले दारिद्र्य आणि बेरोजगारी दूर करण्याचे पुण्य ठाकरे सरकारने पदरात घ्यावे.