नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करण्याची या नेत्याने केली मागणी
सुरज गायकवाड
ग्लोबल न्युज: परदेशातून येणाऱ्या लोकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे देशात कोरोना या संसर्ग आजाराचा प्रसार झाला आहे. यासाठी सर्वस्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान मोदींवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भारतात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ते दुरुस्त करण्याच्या स्थितीमध्ये हे सरकार दिसत नाही. संकटावर संकट येणार असून त्याचबरोबर श्रीमंतांची श्रीमंती वाढणार आहे. गरीब आणखी गरीब होतील,असंही ते म्हणाले.
दरम्यान, ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. अशा ठिकाणीही लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकांच्या टॅक्समधून येणारा पैसा हा ग्रामीण भागात वापरायचा असतो. प्रत्येक मजुराला काम मिळाले पाहिजे. १० हजार कोटींची गंगाजळ ही टॅक्समधून ग्रामीण भागासाठी येते. ते पैसे वापरण्यात आले पाहिजेत. जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांवर उपासमारीची वेळ येणार नाही, असंही आंबेडकर यांनी सांगितले.